DIWALI 2021: दिवाळीच्या आनंदाला यंदाही चिनी रोषणाईचेच कोंदण!, सुमारे १५०० कोटींच्या मालाची होणार उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 07:01 AM2021-10-26T07:01:35+5:302021-10-26T07:02:07+5:30

DIWALI 2021: गेल्या सहा-सात महिन्यांपासून चीनहून माल दाखल झालेला नसतानाही मुंबईच्या बाजारपेठांत मालाचा पन्नास टक्के साठा व्यापाऱ्यांनी करून ठेवला आहे. त्यामुळे खरेदी-विक्री व्यवहार जोरात सुरू आहेत. 

DIWALI 2021: Chinese lights to celebrate Diwali this year too, goods worth Rs 1,500 crore | DIWALI 2021: दिवाळीच्या आनंदाला यंदाही चिनी रोषणाईचेच कोंदण!, सुमारे १५०० कोटींच्या मालाची होणार उलाढाल

DIWALI 2021: दिवाळीच्या आनंदाला यंदाही चिनी रोषणाईचेच कोंदण!, सुमारे १५०० कोटींच्या मालाची होणार उलाढाल

googlenewsNext

- सचिन लुंगसे

मुंबई  : यंदाच्या दिवाळीत चिनी वस्तू घेऊ नका... चिनी मालावर बहिष्कार घाला... अशा आशयाच्या संदेशांचा भडीमार समाजमाध्यमांतून सातत्याने होत असताना प्रत्यक्षात मात्र दिवाळीच्या रोषणाईसाठी मुंबईतील इलेक्ट्रिक साहित्याच्या बाजारपेठा चिनी मालाने प्रकाशमान झाल्या आहेत. दिवाळीत चिनी मालाची १२०० ते १५०० कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. 

सीमारेषेवर चीन सातत्याने काढत असलेल्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारे संदेश समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ होत आहेत. मात्र, मुंबईतील लॅमिंग्टन रोड आणि उर्वरित मोठ्या बाजारपेठांमध्ये ‘चायना मार्केट’ म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या इलेक्ट्रिक साहित्याच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या पडत असल्याचे चित्र आहे.

गेल्या सहा-सात महिन्यांपासून चीनहून माल दाखल झालेला नसतानाही मुंबईच्या बाजारपेठांत मालाचा पन्नास टक्के साठा व्यापाऱ्यांनी करून ठेवला आहे. त्यामुळे खरेदी-विक्री व्यवहार जोरात सुरू आहेत. 

स्वस्तात मस्त!
भारतीय मालाच्या तुलनेत चिनी साहित्य स्वस्त आहे. देशात बनवलेल्या एखाद्या वस्तूची किंमत २०० रुपये असेल तर त्याच प्रकारच्या चिनी वस्तूची किंमत ८० रुपये आहे. त्यामुळे ग्राहक चिनी साहित्याची खरेदी करतात. 
एका विक्रेत्याने गेल्या दहा दिवसांत इलेक्ट्रिक तोरणाचा तब्बल २५ लाखांचा माल विकला. चीनमधून येणारे साहित्य ८० टक्के कमी झाले असले तरी छुप्या मार्गाने अनेक वस्तू बाजारपेठेत दाखल होत आहेत, असे एका विक्रेत्याने सांगितले. 

मुंबईतील कोणतीही बाजारपेठ असो, बाजारपेठांमध्ये ‘मेड इन चायना’च्या नावाखाली फसवणूक होणार नाही याची खबरदारी ग्राहकांनी घ्यावी. इलेक्ट्रिक साहित्याच्या बाजारपेठांत उच्च दर्जाच्या साहित्याची खरेदी करावी. अशा प्रकरणांत लेबलद्वारे फसवणूक होण्याची शक्यता असते.    - विक्रम कांबळे, इलेक्ट्रिक साहित्य जाणकार, ग्रँट रोड

Web Title: DIWALI 2021: Chinese lights to celebrate Diwali this year too, goods worth Rs 1,500 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.