Join us

दिवाळी धमाका, मुंबईत बाजारपेठा हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 7:32 AM

लक्ष लक्ष दिव्यांनी दाही दिशा उजळून टाकणाºया दीपावलीने मुंबईकरांचा आनंद द्विगुणित करण्यास आंरभ केला आहे. दिवाळीत लहानग्यांनी साकारलेल्या किल्ल्यांवर पताका फडकणार असतानाच बाजारपेठांमधील खरेदी-विक्रीचा उत्साह ओसंडून वाहू लागला आहे.

अक्षय चोरगे, सागर नेवरेकर/  मुंबई : लक्ष लक्ष दिव्यांनी दाही दिशा उजळून टाकणाºया दीपावलीने मुंबईकरांचा आनंद द्विगुणित करण्यास आंरभ केला आहे. दिवाळीत लहानग्यांनी साकारलेल्या किल्ल्यांवर पताका फडकणार असतानाच बाजारपेठांमधील खरेदी-विक्रीचा उत्साह ओसंडून वाहू लागला आहे. जीएसटी, महागाईसारख्या घटकांनी ग्राहकांचे कंबरडे मोडले असले तरी प्रत्यक्षात ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा...’ असे म्हणत मुंबईकर ग्राहक बाजारपेठांवर तुटून पडले आहेत. दादर, लालबाग, कुर्ला, घाटकोपरसह ठिकठिकाणच्या बाजारपेठा रविवारी खरेदी-विक्रीच्या उत्साहाने ओसंडून वाहत असतानाच सोमवारसह मंगळवारी यात आणखीच भर पडणार आहे. अशाच काहीशा बाजारपेठांतील उत्साहपूर्ण खरेदी-विक्रीचा आढावा ‘लोकमत’ने यानिमित्ताने घेतला आहे.दादर, लालबाग, कुर्ला, घाटकोपर इत्यादी बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केली आहे. दिवाळीच्या सणानिमित्त फराळ, कंदील, तोरण आणि रांगोळी या वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. फराळाला बाजारात चांगलीच मागणी आहे. बाजारी फराळात करंजी ३६० ते ४४० रुपये किलो, शंकरपाळी २०० ते २४० रुपये किलो, अनारसे ४०० ते ६०० रुपये किलो, चकली १८० ते ३६० रुपये किलो, बेसन लाडू २८० ते ४४० रुपये किलो, रवा लाडू २८० ते ३६० रुपये किलो, मोतीचूर लाडू १६० ते २०० रुपये किलो, बुंदी लाडू १८० रुपये किलो, नानकटाई बिस्किट २४० रुपये किलो, पातळ पोहे चिवडा १८० ते २४० रुपये किलो, शेव १८० रुपये किलो असा भाव सध्या बाजारात सुरू आहे.बाजारातील दुकाने विविध रंगीबेरंगी कंदिलांनी सजली आहेत. पॅराशूट कंदील, जाळीदार कंदील, जम्बो कंदील, कागदी कंदील, फाइव्ह स्टार कंदील आणि कापडी कंदील आणि इकोफ्रेंडली कंदील बाजारात उपलब्ध आहेत. बाजारात ५० ते २ हजार रुपयांपर्यंतच्या किमतीतील कंदील विकले जात आहेत. त्यात छोट्या कंदिलांची किंमत ५० ते २०० रुपये आहे. कागदी व प्लास्टिक आकाशकंदील ५० ते १०० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. दिवाळी सणात घराची सजावट करण्यासाठी रांगोळी हा महत्त्वाचा घटक आहे. बाजारात अनेक रंगाच्या रांगोळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रांगोळी घेण्यासाठी महिलावर्गाची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. रंगांची किंमत एक काचेचा ग्लास १० रुपयेप्रमाणे आहे. तसेच रांगोळीचे साचे १० ते २० रुपयांनी बाजारात विकले जात आहेत. रांगोळीची जाळी ५० ते १०० या किमतीने बाजारात उपलब्ध आहे.फटाक्यांना अल्प प्रतिसादफटाके विक्रीवरील नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. परिणामी बाजारांमध्ये फटाक्यांची दुकाने, स्टॉल्स खूप कमी असल्याने फटाक्यांचा व्यवसाय थंड आहे. दादर मार्केटमध्ये मागील वर्षी ६ ते ७ दुकाने आणि २० हून अधिक फटाक्यांचे स्टॉल्स होते.पणत्याच भारीबाजारांमध्ये नानाविध प्रकारच्या, रंगाच्या, नक्षीच्या आणि मातीच्या आकर्षक पणत्या उपलब्ध असल्या तरी पारंपरिक मातीच्या पणत्यांनाच सर्वाधिक मागणी असल्याचे दिवे, पणती विक्रेते अजय चव्हाण यांनी सांगितले. या पणत्या इतर पणत्यांच्या तुलनेने स्वस्त आहेत.दिव्यांची विक्रीचेंबूर, कुर्ला, दादर मार्केटमध्ये दिवे विक्रेत्यांची मोठी संख्या पाहण्यास मिळाली. पारंपरिक मातीचे लाल दिवे खरेदी करण्यावर प्राधान्य दिले जात आहे. ३० ते ५० रुपये डझन किमतींमध्ये लाल पणत्या आणि दिवे बाजारांमध्ये उपलब्ध आहेत. फॅन्सी आणि नक्षीकाम केलेल्या मनमोहक पणत्याही ग्राहकांची पसंती मिळवत आहेत, असे विक्रेत्यांनी सांगितले. ५० ते १२० रुपये प्रति ४ नग अशा किमतींमध्ये फॅन्सी, रंगीबेरंगी, नक्षीकाम केलेल्या पणत्या उपलब्ध आहेत. मटका पणती आणि चिनीमातीच्या पणत्याही लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मटका आणि चिनीमातीच्या पणत्या ६० ते १०० रुपयांना ४/५ नग मिळतात.मेणाच्या पणत्यांना अल्प प्रतिसाद : मागील काही वर्षांपासून मेणाच्या पणत्याही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मात्र मेणाच्या पणत्यांना ग्राहकांचा अल्प प्रतिसाद असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ४० ते ७० रुपये डझन आणि ३०० ते ४५० रुपयांमध्ये १०० नग मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.फुलबाजा जोरात : लहान फुलबाजाचे पाकीट ७० ते १०० रुपये आणि मोठ्या फुलबाजाचे पाकीट १५० रुपये ते ४०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. भुईचक्र १२० ते ३०० रुपये आणि पाऊस १५० ते ३५० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. रॉकेट ६० ते १५० रुपये आणि तोट्यांच्या लहान माळा २० ते ६० रुपये या किमतींमध्ये उपलब्ध आहेत.घरगुती फराळ केंद्रस्थानीघरगुती फराळाला बाजारात चांगलीच मागणी आहे. त्यात लाडू, करंजी, शंकरपाळी, चकली, चिवडा, शेव या पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. करंजी आणि चकली ३५० रुपये किलो, लाडू सर्व प्रकारचे प्रत्येकी १४ रुपये नग आणि शंकरपाळी, चिवडा, शेव ३०० रुपये किलो अशा भावात घरगुती फराळ उपलब्ध आहेत. घरगुती पदार्थ चांगल्या दर्जाच्या तेलातून बनवलेले असतात. त्यामुळे घरगुती फराळांच्या किमती जास्त आहे, अशी माहिती घरगुती फराळ विक्रेते वैभव कदम यांनी दिली.दिवाळी ‘प्रकाश’मयबाजारात अनेकविध प्रकारच्या लाइट्स, बल्ब, फोकस यांची खरेदी ग्राहक करताना दिसत आहेत. बाजारात बॉल लाइट, जेलीबॉल लाइटला, तोरण लाइट आणि रिबीन पट्टीला ग्राहकांची पसंती आहे. बॉल लाइट व जेलीबॉल लाइट २०० ते ३०० रुपयांपर्यंत आहेत. बल्बपट्टी लाइट व रिबीन लाइट ३५० ते ४०० रुपये आहे. विणलेले तोरण १५० रुपयांपासून विक्रीला ठेवण्यात आले आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.पेढे आणि बर्फीहीपेढे अनेक प्रकारांत उपलब्ध आहेत. त्यापैकी मलाई पेढे, केशर पेढे, कंदी पेढ्यांना सर्वाधिक मागणी आहे. ५०० रुपयांपासून ८०० रुपये किलोच्या दराचे पेढे दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. बर्फीचेही अनेक प्रकार आहेत. त्यापैकी आंबा बर्फी, साधी बर्फी, मलाई बर्फी मिठाईच्या दुकानांमध्ये ४५० रुपये ते ६५० रुपये किलोच्या दराने उपलब्ध आहे.लाडूचा धमाकालाडूंनाही वाढती मागणी आहे. ५०० रुपये किलोपासून लाडूचे दर आहेत. अनेक दुकानांमध्ये लाडू हे नगांमध्ये विकले जातात. २० रुपये ते ३५ रुपये प्रतिनग लाडू उपलब्ध आहेत. बेसनाचे लाडू, मोतीचूरचे लाडू, बदामाचे लाडू, खव्याचे लाडू आणि डिंकाच्या लाडूंना मोठी मागणी आहे.छोट्या फटाक्यांना मागणीमोठा आवाज करणारे फटाके मार्केटमध्ये उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. फटाक्यांच्या मोठ्या माळाही बाजारामध्ये उपलब्ध नाहीत. फुलबाजा, भुईचक्र, पाऊस, रॉकेट, बंदुका आणि बंदुकांमधील रीळ हेच फटाके सर्वत्र उपलब्ध आहेत. लहान आणि मोठ्या अशा दोन साइजमध्ये फुलबाजा उपलब्ध आहे.कलर बॉम्ब : जास्त आवाज न करणारा परंतु रंगीबेरंगी अशा किटकॅट कलर बॉम्बला सर्वाधिक मागणी आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.मिक्स मिठाई : मिक्स मिठाई, बंगाली स्वीट्स, दिवाळीचा फराळ, मैसूर, हलवा, सुतार फेणी, जिलेबी, गुलाबजाम, रसगुल्ले, रसमलाई हे पदार्थही खरेदी करण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.मिठाईसाठी गर्दी : मिठाईच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मिठाईच्या कारखान्यांमध्ये कारागिरांची संख्या आणि काही ठिकाणी कारागिरांचा कामाचा कालावधी वाढवला असल्याचे मिठाई विक्रेत्यांनी सांगितले. मिठाईमध्ये काजू कतलीलाच दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वाधिक मागणी आहे. ८०० रुपये ते १२०० रुपये किलोच्या दरात काजू कतली उपलब्ध आहे.

टॅग्स :दिवाळी