एसटी कर्मचा-यांना दिवाकर रावतेंची दिवाळी भेट, 11 टक्के महागाई भत्यासह दिवाळी बोनस जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 06:24 PM2017-10-13T18:24:00+5:302017-10-13T18:50:03+5:30
एसटीच्या 1 लाख 4 हजार कर्मचा-यांना जुलै 2016 पासून प्रलंबित असलेल्या 11 टक्के महागाई भत्यासह 2500 रुपये आणि दोन हजार अधिकारी वर्गाला 5000 रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) दिवाळी भेट म्हणून देण्याची घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे
मुंबई - एसटीच्या 1 लाख 4 हजार कर्मचा-यांना जुलै 2016 पासून प्रलंबित असलेल्या 11 टक्के महागाई भत्यासह 2500 रुपये आणि दोन हजार अधिकारी वर्गाला 5000 रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) दिवाळी भेट म्हणून देण्याची घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. जुलै 2016 ते सप्टेंबर 2017 या 15 महिन्याचा साच टक्के थकित महागाई भत्ता व ऑगस्ट 2017 ते सष्टेंबर 2017 चा चार टक्के प्रलंबित महागाई भत्त्यापोटी 113 कोटी रूपये व सानुग्रह अनुदानापोटी 27 कोटी रूपये , असे 140 कोटी रूपये तात्काळ कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्याचा आदेश रावते यांनी एसटी प्रशासनाला दिला असून कामगारांना महागाई भत्याच्या थकबाकीसह 15 हजार ते 20हजार रुपये मिळणार असल्याने एसटी कर्मचा-यांची दिवाळी आनंदात साजरी होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांना मिळणार 8.33 टक्के दिवाळीचा बोनस
पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांनाही दिवाळीचा बोनस मंजूर करण्यात आला आहे. पीएमपीएमएल संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. पुणे महानगरपालिका 19 कोटी, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 12 कोटी देणार आहे. यंदा कर्मचा-यांना 8.33 टक्के बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंढे यांचा पीएमपीएल कर्मचा-यांना बोनस देण्यासाठी पूर्णपणे विरोध होता. या आधीही त्यांनी हे स्पष्टपणे सांगितले होते. मात्र आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस 8.33 टक्के बोनस जाहीर करण्यात आला आहे. यासाठी पुणे महापालिका 19 कोटी, तर पिंपरी महापालिका 12 कोटी देणार आहे. मात्र या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, मला बोनस घेणे योग्य वाटत नाही. मी मुंबईत होतो तेव्हा पण घेतले नाही आणि आताही घेणार नाही, असे स्पष्ट केले.
बैठकीविषयी बोलताना मुंढे म्हणाले की, कर्मचारी वर्गाला सानुग्रह अनुदान आणि सर्व रक्कम मिळून आता 32 कोटी द्यावे लागणार आहे. आता ही रक्कम पुणे 19 कोटी आणि पिंपरी महापालिका 12 कोटी अशी दोन्ही महापालिका रक्कम देणार आहेत. यापूर्वीच्या नियमानुसार मी निर्णय घेतले असून पुढील दिवाळीत सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय पीएमपीएमएलची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता व्यस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष निर्णय घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले.