बाजारपेठेवर चढला दिवाळीच्या चैतन्याचा साज, ग्राहकांनी गाठला रविवारचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 05:40 AM2017-10-16T05:40:29+5:302017-10-16T05:42:20+5:30
सुखमय जीवनाची मंगलकामना करणा-या दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मुंबईकर खरेदीसाठी घराबाहेर पडल्याने थोडी मरगळ आलेल्या बाजारपेठेवर रविवारी चैतन्याचा साज चढला.
मुंबई : सुखमय जीवनाची मंगलकामना करणा-या दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मुंबईकर खरेदीसाठी घराबाहेर पडल्याने थोडी मरगळ आलेल्या बाजारपेठेवर रविवारी चैतन्याचा साज चढला. ग्राहकांच्या गर्दीमुळे मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमधील बाजारपेठा फुलल्या. इतकेच नव्हे तर अकस्मात पावसाने हजेरी लावल्यानंतरही ग्राहकांचा उत्साह कायम राहिल्याने व्यापाºयांच्या चेहºयावरही समाधानाचे भाव तरळले. दादर बाजारपेठेत पायी चालणेही कठीण झाले होते.
दिवाळी म्हणजे नवीन कपडे परिधान करण्याचा, गोडधोड पदार्थांवर यथेच्छ ताव मारण्याचा, घर सजवून रोषणाईने ते उजळून टाकण्याचा दीपोत्सव. बच्चेमंडळींच्या परीक्षा शनिवारी संपल्यानंतर बाजारपेठा फुलण्यास सुरुवात झाली. चाकरमान्यांचा पगार झाला असून, अनेकांचा बोनसही जमा झाला आहे.
मुंबई-ठाणे पट्ट्यात संध्याकाळी कोसळलेल्या पावसाने रस्त्यावरील विक्रेते आणि ग्राहकांची दाणादाण उडवली. तरीही ग्राहकांचा खरेदीचा उत्साह ओसरला नाही. मध्यरात्री उशिरापर्यंत खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती.
पालघरमध्ये चिनी वस्तूंची पिछेहाट
पालघर जिल्ह्यात सर्वत्र दिवाळीच्या खरेदीचे वातावरण रविवारी पाहायला मिळाले. ‘स्वदेशी वापरा’ या मोहिमेचा परिणाम सर्वत्र दिसतो आहे. त्यामुळे बाजारपेठेतून चिनी वस्तूंची पिछेहाट झाली आहे. कंदील, रोषणाई आणि फराळाच्या पदार्थांच्या दुकानांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.
रायगडमध्ये पारंपरिक कंदिलांना पसंती
अलिबागमधील रायगड बाजारमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी के ली होती. प्लास्टिकच्या आकाशकंदील खरेदीस ग्राहकांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. कागदी आणि त्यातही पारंपरिक आकाशकंदिलांना अधिक पसंती दिसून येत होती. फटाक्यांच्या बाबतीत मात्र बालगोपाळांमध्ये चलबिचल दिसत होती.