कोरोनाला धुडकावून लावत मुंबईत दिवाळीचे चैतन्य; खरेदीला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 02:19 AM2020-11-13T02:19:41+5:302020-11-13T06:54:00+5:30
खरेदीला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद; बाजारपेठांमध्ये एकच गर्दी
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे सण व उत्सवांवर प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. तरीही नागरिकांचा सण साजरा करण्याचा उत्साह मात्र काही कमी झालेला नाही. यंदाच्या दिवाळीतमुंबईकरांनी खरेदीला अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी मुंबईतील सर्व परिसरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केलेली दिसून येत आहे. फटाके, कंदील, रंगीबिरंगी दिवे, मिठाई, रांगोळी व पणत्या, फुल व हार, नवीन कपडे, गाड्या व इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा सर्व वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबईकर घराबाहेर पडला आहे. यामुळे लॉकडाऊन दरम्यान ठप्प झालेले उद्योग व व्यवसाय हळूहळू रुळावर येऊ लागले आहेत. नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी चांगला प्रतिसाद देत असल्याने व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
काही नागरिक आजही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत असल्याने त्यांनी ऑनलाइन शॉपिंगला पसंती दर्शविली आहे. वस्तूंचा ऑनलाइन व्यापार देखील तेजीत असल्याचे दिसून येत आहे. बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी केली असली तरीही यंदा व्यापाऱ्यांना ३० ते ४० टक्के नुकसान सहन करावे लागले आहे.
कोरोनाचा संसर्ग अजूनही थांबला नसला तरीही सण हे साजरे करायचे आहेत. त्यामुळे खरेदीसाठी घरातून बाहेर पडावे लागत आहे. बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहून आनंद होत आहे. मात्र अनेक जण गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरत नाहीत, तसेच सामाजिक अंतर राखत नाहीत यामुळे यावर प्रशासनाचे नियंत्रण असायला हवे. - जयेश म्हात्रे, रहिवासी, चेंबूर