अंधेरीत रंगली दिवाळी पहाट; देवदत्त साबळे, त्यागराज खाडिलकर, पॅडी कांबळेंची विशेष उपस्थिती

By मनोहर कुंभेजकर | Published: November 12, 2023 05:47 PM2023-11-12T17:47:45+5:302023-11-12T17:49:51+5:30

शास्त्रीय संगीताचा वारसा असणारे मराठी संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायक त्यागराज खाडिलकर यांनी अनेक गाणी गावून संगीतप्रेमींना दिवाळीची अनोखी भेट दिली.  

Diwali dawn in Andheri; Special presence of Devdutt Sable, Thyagaraj Khadilkar, Paddy Kamble | अंधेरीत रंगली दिवाळी पहाट; देवदत्त साबळे, त्यागराज खाडिलकर, पॅडी कांबळेंची विशेष उपस्थिती

अंधेरीत रंगली दिवाळी पहाट; देवदत्त साबळे, त्यागराज खाडिलकर, पॅडी कांबळेंची विशेष उपस्थिती

मुंबई- कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लोकशाहीर महाराष्ट्राच्या  लोककलेचा  मानबिंदू आहे. आजही डफावरची थाप कानावर पडली तरी शाहीर साबळेंची आठवण प्रत्येकाला येते. याच शाहिरांचा वारसा चालविणारे त्यांचे पुत्र व प्रसिद्ध संगीतकार व गायक देवदत्त साबळे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व अंधेरी पश्चिम येथील अंधेरीचा राजा मैदानात, आझाद नगर सार्वजनिक उत्सव समिती यांच्यातर्फे संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात महाराष्ट्राच्या लोकधारेची आठवण करून देणारी सुमधुर संगीताची एक छोटेखानी मैफिल रसिक प्रेक्षकांना उपलब्ध करून दिली. 

या कार्यक्रमाला शिवसेना नेते व माजी मंत्री अँड. अनिल परब तसेच शिवसेना उपनेते व युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर उपस्थित होते. २००३ सालापासून हा दिवाळी पहाट कार्यक्रम मुंबई महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर (शैलेश) फणसे यांच्या नेतृत्वाखाली होत असून मराठी व हिंदी संगीत क्षेत्रातील नावाजलेले कलाकार या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात सहभागी होत असतात  यावर्षी या दिवाळी पहाटचे एकविसावे वर्ष होते.

शास्त्रीय संगीताचा वारसा असणारे मराठी संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायक त्यागराज खाडिलकर यांनी अनेक गाणी गावून संगीतप्रेमींना दिवाळीची अनोखी भेट दिली.  तर चित्रपट व रंगभूमी अभिनेते  तसेच हास्यमालिका सम्राट पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी यांनी विशेष उपस्थिती दाखविली, कामगार वस्तीमध्ये राहून कलेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या पंढरीनाथ कांबळे यांनी आपला जीवनपट प्रेक्षकांसमोर सादर केला तसेच त्यांनी  या कार्यक्रमात काही गाणीही गायली. या कार्यक्रमाला लॉरिया अलमेडीया, वैभवी  कदम, प्रमोद तळवडेकर या गायकांची साथ लाभली होती, या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसिद्ध निवेदिका मृण्मयी भजक यांनी केले. 

नवसाला पावणारा अंधेरीचा राजा अशी ख्याती असलेल्या गणशोत्सवाचे आयोजन करणाऱ्या आझाद नगर सार्वजनिक उत्सव समिती व शिवसेना वर्सोवा विधानसभेतर्फे हि अनोखी संगीत मैफिल आयोजित केली होती. जेष्ठ संगीतकार व गायक देवदत्त साबळे यांचे ‘आठवणीतील किस्से’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. ‘ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु’ किंवा ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना’ ही त्यांनी ५० वर्षांपूर्वी संगीतबद्ध केलेली गाणी आजही तारुण्यात आहे असे भावनिक उद्दगार देवदत्त साबळे यांनी काढले. उत्तम संगीतकार व गायक होण्यासाठी वडिलोपार्जित वारसा असून चालत नाहीत तर कलेवरील अपार श्रद्धा, मेहनत हि प्रत्येकाला घ्यावीच लागते असे मार्गदर्शन त्यांनी उपस्थिती नवोदित कलाकारांना केले.

आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक राणे, कार्याध्यक्ष महेंद्र धाडिया, सचिव विजय सावंत व खजिनदार सुबोध चिटणीस यांनी सर्व कलाकारांचे आभार मानून त्यांचा सत्कार केला.

Web Title: Diwali dawn in Andheri; Special presence of Devdutt Sable, Thyagaraj Khadilkar, Paddy Kamble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.