दिवाळी पहाट थंडीने उजाडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 05:11 PM2020-10-31T17:11:10+5:302020-10-31T17:11:34+5:30
Temperature Down : राज्याच्या तापमानात १ किंवा २ अंशांनी घट होणार
१ नोव्हेंबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल
मुंबई : मान्सून संपुर्ण देशातून माघारी परतला असून, ऑक्टोबर हिटने पाठ फिरवली आहे. परिणामी आता ऋतू बदलानुसार थंडीची चाहूल लागणार असून, हवामान खात्याने देखील राज्यातील बहुतांश भागात पुढील चार आठवडे कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा १ किंवा २ अंशानी खाली असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे दिवाळीची सुरुवात पहाटेच्या थंडीने होणार आहे. दरम्यान, ३१ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद रत्नागिरीत ३६ तर नाशिक येथे सर्वात कमी म्हणजे १५ अंशाची नोंद झाली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मान्सून माघारी फिरला असला तरी देखील गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागात तर कोकण गोव्याच्या तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. दुसरीकडे अजूनही पावसाचा अंदाज कायम आहे. १ नोव्हेंबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत गोव्यासह संपुर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. मुंबईचा विचार करता मुंबईत रविवारी आणि सोमवारी आकाश मुख्यत: निभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २४ अंशाच्या आसपास राहील.