दिवाळी फराळ निघाला अमेरिका अन् ऑस्ट्रेलियात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:14 PM2024-10-14T12:14:12+5:302024-10-14T12:15:03+5:30
खमंग, खुसखुशीत फराळ दिवाळीपुरताच न खाता वर्षभर खाल्ला जात असल्याने बाराही महिने अनेकांकडे फराळाचे गुऱ्हाळ सुरूच असते.
माधवी पाटील - वरिष्ठ उपसंपादक
डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस... अमेरिकेत यंदा दिवाळीत राजकीय चर्चेचा फराळ आहेच; शिवाय मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीतून जाणारे लाडू, चिवडा, चकलीवरही अमेरिकन ताव मारणार आहेत. फक्त अमेरिकाच नव्हे, तर जगातील अनेक देशांमध्ये मुंबईतून दिवाळीचा फराळ रवाना होणार आहे.
खमंग, खुसखुशीत फराळ दिवाळीपुरताच न खाता वर्षभर खाल्ला जात असल्याने बाराही महिने अनेकांकडे फराळाचे गुऱ्हाळ सुरूच असते. त्यातही दिवसेंदिवस हेल्थ कॉन्शिअस असणाऱ्या पिढीसाठी अनेक जण हेल्दी अन् ‘डाएट’ फराळ बनवतात. शिवाय त्यांच्या प्रत्येक पदार्थात न्यूट्रीशन व्हॅल्यू असल्याने रेडिमेड फराळाला सध्या पर्याय नसून, दसरा संपताच दिवाळीच्या महिनाभर आधीच त्याची जय्यत तयारी आणि बुकिंगही सुरू झाले आहे. हा फराळ अमेरिका, लंडन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, यूके, दुबई, कॅनडा, हाँगकाँग, मलेशिया, ओमान, कतार, फ्रान्स, जपान, आफ्रिका आदी देशांतील विविध प्रमुख शहरांत पाठविला जातो. कुरिअर, पोस्टाद्वारे तर काही ई-कॉमर्स कंपन्यांकडूनही ऑनलाइन ऑर्डरद्वारे हा फराळ परदेशात पोहोचविला जातो. याशिवाय काही कुटुंबे येथून फराळ घेऊन स्वत: दिवाळीसाठी तेथे जाऊन मुलाबाळांसह सहपरिवार दिवाळीचे सेलिब्रेशन करतात. त्यामुळे घटस्थापनेपासूनच रेडिमेड दिवाळी फराळाची बुकिंग सुरू झाली आहे.
दादरमध्ये गेली ८० वर्षे फॅमिली स्टोअर्सच्या माध्यमातून अभिजीत जोशी यांची तिसरी पिढी या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांच्याकडील दिवाळीच्या पदार्थांबरोबरच विविध प्रकारच्या पिठांनाही वर्षभर मागणी असते. त्यांची चकलीची भाजणी, शेवेचे आणि अनारसाचे पीठ ग्राहकांच्या खास पसंतीचे आहे. २००७ पासून ते परदेशात फराळ पाठवत असून, यूएस, यूके, यूएई, कॅनडा, दुबई, ऑस्ट्रेलिया, युरोप येथे त्यांचा फराळ दरवर्षी जातो.
बेसन, रवा लाडू, कडबोळी, कांदा चिवडा ही त्यांची खासियत. फुलवलेला चिवडा, मका चिवडा, चकली, करंजी, कडक बुंडी लाडू, लसूण, गाठी शेव या पारंपरिक फराळासह त्यांच्याकडील मिनी बाकरवडी, नानकटाई, बेक्ड गोड शंकरपाळे, सँडविच शंकरपाळे, क्रिस्पी, खारे शंकरपाळे, सुतरफेणी यांनाही विशेष मागणी आहे. आजोबांपासूनची पदार्थांची चव, दर्जा त्यांनी आजही टिकवून ठेवला आहे. ते परदेशात तीन, सहा आणि आठ किलोचे विशेष हॅम्पर पाठवितात. यात दिवाळी फराळाबरोबरच पणत्या, वाती, उटण्याचा साबण, आकाशकंदील यांचा कॉम्बो असतो. ज्याला खास पसंती मिळत आहे.
जिभेवर दीर्घकाळ रेंगाळणारी चव अन् उत्तम दर्जा यामुळे गेली २० वर्षे फूड इंडस्ट्रीमध्ये अभिजीत ठोसर पत्नीच्या साथीने कार्यरत आहेत. ठाण्यातील नौपाडा येथील राज स्नॅक्स व पोळी-भाजी केंद्र ते चालवत असून, एस ठोसर्स क्वालिटी प्रोडक्ट्स असा त्याचा ब्रँड आहे. काजू चिवडा, पातळ पोह्याचा चिवडा, चकली, शंकरपाळ्या, अनारस, साजूक तुपातील रवा, बेसन, मोतीचूर आणि रवा-नारळाचे लाडू, ओल्या नारळाच्या करंजा असा त्यांचा दिवाळी फराळ असून, चिरोटे ही त्यांची खासियत आहे. रवा-नारळाचे लाडू आणि ओल्या नारळाच्या करंजा साधारण आठ दिवस आणि अन्य पदार्थ सुमारे महिनाभर टिकतील, अशा पद्धतीने उत्तम प्रतीचे साहित्य वापरून बनविले जातात. पॅकिंगसाठी स्टँडी पाऊच, ट्रे पॅकिंग, बॉक्सचा वापर केला जातो. त्यांचा फराळ ठाणे, मुंबईसह अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, फ्रान्स, जपान, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, गिनिया, बिसायू, दुबई येथे जातो. मध्यंतरी कारगिलमध्येही सेवाभाव म्हणून त्यांनी फराळ पाठविला होता.
बचत गटातील महिलाही पुढे
दिवाळी फराळात विविध प्रकारच्या चकल्या, चिवडा, शेव, कडबोळी, वेफर्स, शंकरपाळे, आंबाबर्फी, गूळबुंदी लाडू, बेसन लाडू, करंज्या, अनारसे, चिरोटे, फरसाण, कंदील, पणत्या, साबण, कॅलेंडर आणि रांगोळीचे स्टिकर असा फॅमिली हॅम्परमध्ये समावेश असतो.
घरगुती फराळ विकणाऱ्या दुकानांबरोबरच महिला बचत गटही दिवाळीच्या फराळाचे पदार्थ आणि वस्तू मोठ्या संख्येने बनवितात. घरगुती पद्धतीने मात्र चव, दर्जा यांच्याशी तडजोड न करता चवदार फराळाचे पदार्थ बनवून ते ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले जात असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो.
फराळाच्या पदार्थांच्या पॅकिंगसाठीही खास पद्धतींचा अवलंब केला जातो. फिनिशिंग, पॅकिंगचे परडी, बॉक्स, सोनेरी-चंदेरी रॅपिंग याकडे विशेष लक्ष पुरविले जाते. यंदा डाळी, कडधान्ये, तेल यांच्या किमती वाढल्याने दिवाळीचा फराळही ८-१० टक्क्यांनी महागला आहे.