महापालिका, बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; मिळणार २० हजार रुपये सानुग्रह अनुदान, मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 11:27 PM2021-10-29T23:27:38+5:302021-10-29T23:30:04+5:30
गेल्यावर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये तर बेस्ट कर्मचाऱ्यांना दहा हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. मात्र, या वर्षी या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. तसेच सानुग्रह अनुदानाची ही रक्कम पुढील तीन वर्षे कायम राहणार आहे.
मुंबई - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना लॉटरीच लागली आहे. २०२१ ते २०२४ या तीन वर्षांसाठी २० हजार रुपये सानुग्रह अनुदान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केला. यामुळे पालिकेतील ९५ हजार तर बेस्ट उपक्रमाच्या ३२ हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. मात्र यामुळे पालिकेच्या तिजोरीवर अडीशे कोटी रुपयांहून अधिक आर्थिक बोजा पडणार आहे.
दरवर्षी पालिका प्रशासन आणि कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वाटाघाटीनंतर सानुग्रह अनुदानाची रक्कम जाहीर होत असते. तर बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असल्याने काहीवेळा कामगार संघटनांच्या आंदोलनानंतर सानुग्रह अनुदान जाहीर झाला आहे. मागील दोन दिवस सानुग्रह अनुदानाबाबत बैठका सुरु होत्या. तर शुक्रवारी थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावरुन पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आला आहे. या बैठकीत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर उपस्थितीत होते.
गेल्यावर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये तर बेस्ट कर्मचाऱ्यांना दहा हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. मागील दीड वर्ष कोरोना काळात पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले आहे. यामध्ये शेकडो कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. तसेच सानुग्रह अनुदानाची ही रक्कम पुढील तीन वर्षे कायम राहणार आहे.
अशी आहे सानुग्रह अनुदानाची रक्कम -
पालिका कर्मचारी - २० हजार रुपये
बेस्ट कर्मचारी - २० हजार रुपये
आरोग्य सेविका (भाऊबीज भेट) - ५३०० रुपये
माध्यमिक शिक्षक - दहा हजार रुपये
अनुदानित आणि विनानुदानित शाळांमधील कर्मचारी दहा हजर रुपये
कॉलेजमधील शिक्षक १० हजार रुपये
शिक्षण सेवक - २८०० रुपये
पार्ट टाइम शिक्षण सेवक - २८०० रुपये