Join us

दिवाळी सण अगदीच उंबरठ्यावर येऊन ठेपलाय, चला खरेदीला जाऊ यात...

By मनोज गडनीस | Published: November 06, 2023 8:39 AM

वर्षातील सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी, आता अगदीच उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. दिवाळीत खरेदी न करणारी व्यक्ती विरळच.

- मनोज गडनीस (विशेष प्रतिनिधी)

वर्षातील सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी, आता अगदीच उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. दिवाळीत खरेदी न करणारी व्यक्ती विरळच. लोकांच्या खरेदीच्या उत्साहाला द्विगुणित करण्यासाठी बाजारपेठादेखील सज्ज झाल्या आहेत. नव्या फर्निचरपासून, कपडे, आकर्षक गिफ्ट, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा साऱ्यांवर व्यापाऱ्यांनीही घसघशीत सूट योजना जाहीर केल्या आहेत. अशाच वैविध्याने नटलेल्या बाजारपेठेचा हा फेरफटका...

सुका मेवा सर्वात हीटएकेकाळी दिवाळीनिमित्त ज्या गिफ्ट दिल्या जायच्या त्यामध्ये मिठाई हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असायचा पण गेल्या काही वर्षांत यामध्ये काहीसा बदल झाला असून थोडेसे महाग असले तरीदेखील ड्रायफ्रूट्स भेट देण्याचा ट्रेंड वाढला आहे. मुंबईत तुम्ही ज्या भागात आहात त्या भागातील समाजजीवनाच्या दर्जानुसार सुका मेवा उपलब्ध आहे. म्हणजे, अगदी २००-२५० रुपये किलोपासून ते अगदी अडीच हजार रुपयांपर्यंत किलोच्या हिशोबाने सुका मेवा उपलब्ध आहे पण अस्सल मुंबईकरांचे सुका मेवा खरेदी करण्याचे ठिकाण म्हणजे क्रॉफर्ड मार्केट. क्रॉफर्ड मार्केटमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला या दुकानांची मोठी रांग आहे. सुक्या मेव्याच्या दर्जानुसार किमती इथे आकारल्या जातात. केवळ काजू, बदाम नव्हे तर आक्रोड, सुके अंजिर, मनुका, पिस्ता अशा साऱ्यांचे भेट देण्यासाठी योग्य असे बॉक्सेस इथे ५०० ते ५००० किंवा त्यापेक्षा जास्त किमतीला उपलब्ध आहेत.

ऑनलाइन की ऑफलाइन?हा एक मोठा प्रश्न आहे पण अलीकडे महागड्या वस्तू घ्यायच्या असल्या तरी लोक पहिले दुकानात जाऊन त्या पाहून येतात आणि मग तीच वस्तू ऑनलाइन खरेदी करतात. ऑनलाइन खरेदीसंदर्भात अलीकडेच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, इंटरनेटचा वापर नियमित करणाऱ्या लोकांपैकी ४० टक्के लोक हे ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत आहेत. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गृहाेपयोगी वस्तू अशी खरेदी ऑनलाइन करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. 

गृहप्रवेशही जोमातसरत्या दहा महिन्यांत मुंबईमध्ये एक लाखांपेक्षा जास्त मालमत्तांची विक्री झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बिल्डर लोकांनी आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये मुद्रांक शुल्क त्यांनीच भरण्यापासून ते चार चाकी, दुचाकी, विविध वस्तूंनी भरलेला सुसज्ज फ्लॅट अशा काही घोषणा केल्या आहेत.

कोटींची उलाढालएका आर्थिक कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार गेल्यावर्षी मुंबईत दिवाळीमध्ये १५ हजार कोटी रुपयांपर्यंत उलाढाल झाली होती. यंदा २५ हजार कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होण्याचा अंदाज आहे.

कपडे खरेदी केले का?सर्वांना आवडतील आणि परवडतील असे कपडे फॅशन स्ट्रीट, लिकिंग रोडपासून ते मोठ्या मोठ्या मॉलमधील मोठ्या ब्रँडपर्यंत बाजारात सजले आहेत. अलीकडे फॅशनच्या बाजारात पठाणीचा ट्रेंड रुजल्याचे दिसते. त्यामुळे माहिममधील टेलर मंडळी पठाणी शिवण्यात व्यस्त असल्याचे दिसते. 

टॅग्स :दिवाळी 2023