दिवाळीच्या फराळाचे साहित्य १० ते १५ टक्क्यांनी महागले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 03:45 AM2018-10-25T03:45:07+5:302018-10-25T03:45:15+5:30
दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे़ गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी फराळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य १० ते १५ टक्क्यांनी महाग झाले आहे.
- सागर नेवरेकर
मुंबई : दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे़ गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी फराळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य १० ते १५ टक्क्यांनी महाग झाले आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी साजरी करताना सर्वसामान्यांचे महागाईमुळे दिवाळे निघणार आहे. दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी लागणारा मुख्य घटक म्हणजे तेल आणि डालडा. यांच्या किमती घाऊक बाजारात साखर आणि डाळीच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. गेल्या वर्षी ९० रुपयांवर असणाऱ्या डालड्याचा आताचा भाव ११० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर खाद्यतेलाच्या किमतीतही प्रतिलीटर १५ ते २० रुपयांनी वाढल्या आहेत. एक लीटरच्या सनफ्लॉवर तेलासाठी १४० रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या वर्षी याच तेलाची किंमत ११० रुपये प्रतिलीटर होती.
तेल आणि डालड्याच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहक तयार फराळ विकत घेताना दिसत आहेत. मात्र रेडिमेड फराळाच्या किमतीही २० ते ३० रुपयांनी महागल्या आहेत. तयार फराळातील चकली ३७५ ते ४०० रुपये किलो, चिवडा २४० ते ३०० रुपये किलो, शेव ३०० ते ३२० रुपये किलो आणि शंकरपाळी २४० ते ३०० रुपये किलो दराने विकली जात आहे. त्याशिवाय डाएट चिवड्याच्या २०० ग्रॅमच्या पॅकसाठी ५० रुपये मोजावे लागत असून रवा, बेसन लाडू आणि करंजीच्या एका नगासाठी २२ ते २५ रुपये मोजावे लागत आहेत.
दिवाळीच्या फराळामध्ये या वर्षी १० ते १५ टक्क्यांनी वाढ नक्कीच झाली आहे. मात्र आमच्या दुकानातील वस्तूंचे भाव कमी आहेत. सर्वसामान्यांना परवडेल अशाच किमती वस्तूंवर आकारण्यात आल्या आहेत. कच्च्या मालापेक्षा पक्क्या मालाची किंमत जास्त असते. परंतु तयार मालाला सर्वाधिक मागणी ग्राहकांकडून मिळत आहे, अशी माहिती दादरच्या जोशी यांचे फॅमिली स्टोअर्सचे मालक अभिजित जोशी यांनी दिली.
>दिवाळीच्या आधी लोक फराळ बाहेरगावी पाठविण्यात मग्न असतात. प्रत्येक घरातील लोक नोकरी करत असल्याने फराळ बनविण्यासाठी कोणाला वेळही नसतो. त्यामुळे प्रत्येक जण बाहेरील तयार फराळ घेण्याला प्राधान्य देतो. पहिल्यांदा सर्व फराळ हा साध्या तुपातला मिळत होता. परंतु आता साजूक तुपातला माल मिळतो. कमी तेलाच्या वस्तू बाजारात सहजरीत्या उपलब्ध होत असून घरी पदार्थ बनविण्याचे कष्ट सहसा कोणी घेत नाही. आता हौस कमी झाली आहे.
- संकेत झारापकर, समाधान लाडू मंदिर, दादर
>किराणा मालाचे दर
वस्तू किंमत (प्रतिकिलो)
साखर ४० ते १०० रुपये
चणाडाळ ७६ ते २०० रुपये
जाडी चणाडाळ ८० रुपये
जाड रवा ३६ रुपये
बारीक रवा ३६ ते ४० रुपये
पिठीसाखर ४८ रुपये
मैदा ३६ ते ४० रुपये
पातळ पोहे ६० ते ६४ रुपये
भाजके पोहे १२० रुपये
खोबरे ३०० रुपये
बदाम ८८० ते १२०० रुपये
काजू १०८० ते १२०० रुपये