Join us

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; 15,500 रुपयांचे सानुग्रह अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2020 2:14 AM

Diwali gift to Mumbai Municipal Corporation employees : कोरोनाविरुद्ध लढ्यात मोठे योगदान देणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 20 हजार सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी कामगार संघटनांनी केली होती.

मुंबई : कोविड योद्धा बनून गेले सहा महिने अहाेरात्र काम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार, सर्व कर्मचाऱ्यांना 15 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी जाहीर केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत या रकमेत यंदा पाचशे रुपयांची वाढ करण्यात आली.कोरोनाविरुद्ध लढ्यात मोठे योगदान देणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 20 हजार सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी कामगार संघटनांनी केली होती. परंतु, चर्चेसाठी आयोजित तीन बैठका रद्द झाल्या. त्यानंतर कामगार संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानुसार पालिका कामगारांना 15 हजार 500, अनुदानप्राप्त  खासगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7750, मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना 4700 आणि अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना 2350 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. तर आरोग्य स्वयंसेविकांना भाऊबीज भेट म्हणून चार हजार 400 रुपये देण्यात येतील.

यंदा 500 रुपयांची वाढ- पालिका कामगारांच्या सानुग्रह अनुदानामध्ये यंदा पाचशे रुपयांची वाढ करण्यात आली. सानुग्रह अनुदानामुळे पालिकेच्या तिजोरीवर 155 कोटींचा बोजा पडेल. - पालिका कर्मचारी, अनुदानप्राप्त खासगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक, अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि आरोग्य सेविका यांना सानुग्रह अनुदान मिळेल.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकर्मचारी