मुंबईकरांना दिवाळी भेट! शेवटची मेट्रो १०:३० ऐवजी रात्री ११ वाजता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 07:44 AM2023-11-10T07:44:17+5:302023-11-10T07:44:39+5:30
दिवाळीनिमित्त मेट्रोची वेळ वाढविण्याची मागणी होत होती, पण त्यावर ही वेळ केवळ सणासाठी नाही तर कायमस्वरूपी वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे एमएमआरडीएचे प्रमुख डाॅ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.
मुंबई : मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबई मेट्रोने आता रात्री आणखी उशिरापर्यंत प्रवास करता येणार आहे. यासाठी मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वरून शेवटची मेट्रो आता १०:३० ऐवजी रात्री ११ वाजता सुटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएचे अध्यक्ष या नात्याने हा निर्णय घेऊन मुंबईकरांना दिवाळीची भेट दिली आहे. शनिवार ११ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
दिवाळीनिमित्त मेट्रोची वेळ वाढविण्याची मागणी होत होती, पण त्यावर ही वेळ केवळ सणासाठी नाही तर कायमस्वरूपी वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे एमएमआरडीएचे प्रमुख डाॅ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.
आता २५७ फेऱ्या
मुंबई मेट्रो मार्ग २ अ च्या अंधेरी पश्चिम आणि मेट्रो मार्ग ७ च्या गुंदवली स्थानकावरून शेवटची मेट्रो आता १०:३० ऐवजी रात्री ११ वाजता सुटेल.
सध्या मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार-शुक्रवार सकाळी ५:५५ ते रात्री १०:३० या कालावधीत सुमारे २५३ सेवा या साडेसात ते साडेदहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत.
आता सकाळी ५:५५ ते रात्री ११ मेट्रोच्या २५७ फेऱ्या होणार आहेत. तसेच, रात्री १० नंतर दहिसर पश्चिम ते गुंदवलीपर्यंत २ अतिरिक्त मेट्रोच्या फेऱ्या तर डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिम २ अतिरिक्त मेट्रो फेऱ्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.