Join us

दिवाळीत आरोग्य जपा

By admin | Published: November 09, 2015 3:07 AM

दिवाळी म्हणजे उत्साह, आनंदाचा सण. पण आनंदात दिवाळी साजरी करताना दुसऱ्यांना आणि आपल्याला त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.

मुंबई : दिवाळी म्हणजे उत्साह, आनंदाचा सण. पण आनंदात दिवाळी साजरी करताना दुसऱ्यांना आणि आपल्याला त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचा आणि तेलकट, तूपकट पदार्थांच्या अतिसेवनाचा दुष्परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे ही दिवाळी आरोग्यदायी साजरी करण्यासाठी विशेष काळजी घ्या, असा सल्ला डॉक्टर देत आहेत. दिवाळी म्हणजे फटाके आणि फराळ हे समीकरण आहे. पण या दोन्हींच्या अतिरेकामुळे आरोग्यास हानी पोचण्याची शक्यता असते. दिवाळीचा आनंद द्विगुणित करायचा झाल्यास दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवा. त्यामुळे स्वत:ला आणि आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होणार नाही. गेल्या काही वर्षांपासून मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्याचा ट्रेण्ड झाला आहे. दिवाळी साजरी करणे म्हणजे मोठ्या आवाजाचे फटाके फोडणे, असेही चुकीचे समीकरण जोडले जाते. पण त्यामुळे कानाला त्याचा त्रास होतो, काही वेळा इजा होण्याचा धोका असतो. फटाक्यांच्या धुरामुळे घशाला त्रास होतो. घशाला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे फटाके उडवताना काळजी घ्यावी, असे कूपर रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. समीर भार्गव यांनी सांगितले. दिवाळीत चकली, चिवडा, लाडू, करंजी असा फराळ घरोघरी केलेला असतो. इतरही तेलकट, तिखट पदार्थ केले जातात. या पदार्थांच्या अतिसेवनामुळे घसा बसणे, घशाला खवखव होणे असे त्रास उद्भवू शकतात. त्याचबरोबर अति खाल्ल्याने पित्ताचा त्रास होऊ शकतो. ज्यांना श्वसनाचा विकार असतो त्यांना दिवाळीत त्रास बळावण्याचा धोका असतो. कारण फटाक्यांमुळे त्यांना अस्थमाचा त्रास बळावू शकतो. यामुळे विशेष काळजी घ्या, असे डॉ. भार्गव यांनी सांगितले. मुंबईसारख्या शहरात वाढणाऱ्या प्रदूषणाचा दुष्परिणाम मुलांच्या प्रकृतीवर अधिक होतो. हवेत वाढलेल्या प्रदूषणामुळे लहान मुलांच्या डोळ््यांना संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे लहान मुलांच्या डोळ््यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. लहान मुलांना जास्त मोठे फटाके उडवायला देऊ नयेत. फटाके उडवून झाल्यावर हात स्वच्छ धुवायला सांगावेत. फटाक्यांच्या दारूमुळे डोळे जळजळणे, लाल होणे असा त्रास होऊ शकतो. फटक्यामुळे डोळ््याला गंभीर इजा होऊ शकते. या सर्व कारणांमुळे मुलांची विशेष काळजी दिवाळीत घ्या. डोळ््यांचा त्रास जाणवल्यास औषधाच्या दुकानातून औषधे आणून वापरू नका, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या. - डॉ. नयना पोतदार, बाल नेत्रचिकित्सक, सायन रुग्णालय फटाके उडवताना कोणती काळजी घ्याफटाके उडवताना सुती कपडे घाला़ लहान मुलांबरोबर मोठ्या माणसांनी उभे राहा़ जवळ पाण्याने भरलेली बाटली, बादली ठेवा़ हातात घेऊन फटाके उडवू नका़ कमी आवाज करणारे फटाके उडवा़