मुंबई प्रॉपर्टी मार्केटमध्ये दिवाळी धमाका, नोव्हेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत ४८०० मालमत्तांची नोंदणी
By मनोज गडनीस | Published: November 11, 2023 07:34 PM2023-11-11T19:34:46+5:302023-11-11T19:35:16+5:30
चालू महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात मुंबई शहर व उपनगरातमिळून ४८११ मालमत्तांच्या खरेदीचे व्यवहार झाले आहे.
मुंबई -
चालू महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात मुंबई शहर व उपनगरातमिळून ४८११ मालमत्तांच्या खरेदीचे व्यवहार झाले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घर खरेदीचा ट्रेन्ड मुंबईत रुजत असल्याचे दिसून आले. चालू वर्ष मुंबईतल्या बांधकाम उद्योगासाठी धमाकेदार ठरले असून सरत्या दहा महिन्यांत मुंबईत एक लाखांपेक्षा जास्त मालमत्तांची खरेदी झाली आहे. तर गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने महिन्याकाठी दहा हजार मालमत्तांची खरेदी झाली आहे. मात्र, नोव्हेंबरमध्ये पहिल्या दिवसांतच ४८११ मालमत्तांची खरेदी झाल्यानंतर या महिन्यात मालमत्ता खरेदीचा नवा उच्चांक प्रस्थापित होण्याचा अंदाज आहे.
नवरात्री व दसऱ्या निमित्त देखील मुंबईत मोठ्या प्रमाणावर मालमत्तांची खरेदी झाली होती. त्यानंतर दिवाळीमध्ये देखील गृहखरेदीचा जोर कायम राहिला असा अंदाज वर्तविण्यात येत होता. आतापर्यंत ज्या मालमत्तांच्या खरेदीचे व्यवहार झाले आहेत ते प्रामुख्याने मुंबईच्या पश्चिम उपनगरात झाल्याचे दिसून येते. लोकांनी किमान टू बीच के, थ्री बीच के फ्लॅट खरेदी केले आहेत. याकरिता किमान ८० लाख ते ३ कोटी रुपयांची घरे विकली गेली आहेत. नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत झालेल्या मालमत्तांच्या व्यवहारांतून राज्य सरकारला ३५४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.