लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून बरसणाऱ्या परतीच्या पावसामुळे मुंबईच्या हवेतील धुळीचे प्रमाण कमी झाले असले तरी येत्या काही दिवसांत पुन्हा धूलिकणांमुळे प्रदूषण डोके वर काढण्याची शक्यता आहे. दिवाळीत प्रदूषणाचा उच्चांक गाठला जातो. प्रदूषणाला आळा घातला जावा, हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी राहावे यासाठी महापालिकेने कंबर कसली असून पुढील महिन्यापासून नियमितपणे रस्ते धुतले जाणार आहेत. त्यासाठी १०६ टैंकर भाडेतत्त्वावर घेतले जाणार आहेत.
मुंबईतील हवेची गुणवत्ता गेल्या वर्षापासून सातत्याने खालावत चालल्याने प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली होती. महापालिकेने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एक परिपत्रक जारी करून मुंबईतील बांधकाम स्थळांवर प्रदूषण नियंत्रण उपायांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. रस्त्यांवरही पाणी फवारणी करण्यास सुरुवात केली.
सर्व २४ वॉर्डामध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते आणि वर्दळीच्या पदपथांची स्वच्छता आणि धुलाई करण्यास सुरुवात केली होती. याच पार्श्वभूमीवर यंदाही रस्ते धुलाईचा प्रयोग मुंबईत राबविण्यात येणार आहे.
हवेच्या दर्जात सुधारणा दोन दिवस झालेल्या पावसामुळे हवेच्या दर्जात सुधारणा झाली आहे. काही भागांत सातत्याने हवेचा दर्जा वाईट नोंदविला जात होता. पाऊस पडल्याने मुंबईची हवा स्वच्छ झाली आहे. त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवारी हवेचा दर्जा समाधानकारक नोंदविला गेला. धुरके दूर होऊन वातावरणात बदल जाणवत आहे.
पालिकेच्या स्पष्ट सूचना
मुंबई महानगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत असलेली विकास कामे, बांधकामे यासह हवेतील बदलामुळे गुणवत्ता स्तर खालावण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता प्रदूषणासाठी धूळ हादेखील एक घटक कारणीभूत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आतापासून नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या. वायू प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत असलेल्या घटकांवरही अधिक लक्ष केंद्रित करावे, प्रत्यक्ष कार्यक्षेत्रस्थळी कार्यरत अधिकारी कर्मचारी, पोलिस अंमलदारांनी सजग राहून वायू प्रदूषणास कारणीभूत घटकांवर कारवाई करावी, असे त्यांनी नमूद केले आहे.
पालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांची अंमलबजावणी कुठे होत आहे, याची माहितीही पालिकेने द्यावी. या सूचना फक्त कागदावर राहिल्या तर मुंबईकरांच्या आरोग्यावर येत्या काही दिवसांत वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. - रवी राजा, माजी विरोधी पक्षनेता, मुंबई महापालिका