मुंबई - महिला बचत गटांची विविध उत्पादने, दिवाळी फराळ आणि दिवाळी उपयोगी साहित्याला बाजारपेठ मिळावी म्हणून मुंबई शहरातील स्वयंसहायता बचत गटांचा दिनांक 11 आणि 12 ऑक्टो रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्याच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयातील दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली .
मंत्री लोढा म्हणाले, महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ या मेळाव्याचे आयोजन करीत आहे. या मेळाव्यात शंभर महिला बचत गट सहभागी होणार आहेत. स्वयंसहाय्य बचत गटाच्या कार्यक्षेत्रीय स्तरावरील अडचणी जाणून घेणे, त्यांना बचत गट मेळाव्याच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. बचत गटांना ऑनलाईन साहित्य विक्री करता यावी, याकरिता जागतिक बाजारपेठेतील कंपन्याचा सहभाग वाढविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी २.३० ते ६ वाजेपर्यंत विविध कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत. दुपारी ४.३० वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे,आमदार प्रसाद लाड,सदा सरवणकर यांची उदघाटन कार्यक्रमाला उपस्थिती आहे. यशस्वी उद्योजीकांचा सन्मान, बचत गटातील महिलांना उद्योजक व्यवसायिक साहित्य वाटप, प्रातिनिधिक बचत गटांना (बँक कर्ज) धनादेश वाटप,यशस्वी उद्योजिका महिलांचे अनुभव कथन आदी विविध कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत.
बचत गटांचे स्टॉल व मान्यवरांचे मार्गदर्शन
१२ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० ते ६ या कालावधीत महिलांकरीता विविध विषयांवर मार्गदर्शन ठेवण्यात आले आहे. विविध महामंडळाच्या कर्ज योजनांची माहिती,कौशल्य विकास, बँकाकडील पतपुरवठा सेवा व बाजारपेठ, विविध शासकीय महा मंडळे यांच्या महिला बचत गटांसाठी असलेल्या कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार आहे.याच ठिकाणी ११ ते १२ ऑक्टोबर रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे सभागृहाच्या बाहेर महिला बचत गट उत्पादित विविध उत्पादने तसेच दिवाळी फराळ आणि दिवाळी उपयोगी साहित्याच्या विक्री करिता स्टॉल देखील लावण्यात येणार आहेत. माविम ग्रामीण तसेच शहरी भागात मोठया प्रमाणावरती महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहे तरी बचत गटांच्या स्टॉलला जरूर भेट द्यावी असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे.