चक्क दिवाळीत झोपडपट्टीवासियांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार धडकणार एसआरए कार्यालयावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 07:47 PM2021-11-02T19:47:10+5:302021-11-02T19:48:11+5:30
उत्तर मुंबईतून खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली वांद्रे पूर्व एसआरए कार्यालयावर भाजपाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरगरीबांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वांना पक्के घर मिळावे या स्वप्नपूर्तीसाठी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी सातत्याने पाठपुरावा करत आहे. उत्तर मुंबईच्या सहा विधानसभेत आंदोलने, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सोबत एसआरए, म्हाडा अधिकारांच्या हजेरीत विस्तृत बैठकांचे आयोजन त्यांनी केले होते. मात्र अजूनही प्रशासन आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना जाग आली नाही असा आरोप त्यांनी केला.
उद्या बुधवार दि, ३ नोव्हेंबर रोजी २.३० वा. उत्तर मुंबईतून खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली वांद्रे पूर्व एसआरए कार्यालयावर भाजपाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. दिवाळी नंतर मुंबईतील प्रत्येक जिल्यातून सहा वेगवेगळ्या दिवशी म्हणजेच सहा मोर्चे काढून झोपलेल्या प्रशासन आणि गृह निर्माण विभागाला जाग आणण्यासाठी आम्ही आवाज उठवणार असंल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा दोन बैठका घेऊन या संदर्भात प्रशासन आणि गृहनिर्माण विभागाला रेंगाळलेल्या एसआरए प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले.मात्र एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना गोर गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी काही ही गांभीर्य नसल्याचा आरोप त्यांनी केला.
खासदार शेट्टी यांच्या सोबत चर्चा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मालाड पश्चिम येथील तक्षशिला एसआरए इमारतीतील रहिवाशांना घर मिळावे म्हणून संबधित अधिकारी वर्गाने स्वतः जाऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. मात्र दुर्दैवाने या अधिकाऱ्यांना या संदर्भात मालाड पर्यंत यायला अजून वेळ मिळाला नाही. हजारो घरे एसआरए व म्हाडा अंतर्गत बनून तयार असून सुध्धा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या दिरंगाई मुळे गरीबांना हक्काचे घर मिळत नाही. त्या शिवाय भाडे ही मिळत नाही अशी टिका त्यांनी केली.
प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या दिरंगाईचे भांडाफोड करण्यासाठी आपण आता शांत बसणार नाही. दिवाळीच्या आदल्या दिवशीच एसआरए कार्यालयावर धडक मोर्चा उद्या काढण्यात येणार आहे. मुंबईकरांना हक्काचे पक्के घर मिळावे हाच माझ्या साठी मोठा सण असून हीच माझी दिवाळी असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.