मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांची दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 05:21 PM2020-11-18T17:21:11+5:302020-11-18T17:21:30+5:30
Real Estate : गेल्या नोव्हेंबरपेक्षा दुप्पट घरांच्या विक्रीची चिन्हे
१७ दिवसांत ओलांडला गेल्या वर्षीचा टप्पा
मुंबई : सरकार आणि विकासकांकडून सवलतींचा वर्षाव होत असल्याने मुंबईतील घरांच्या खरेदी विक्री व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत जेवढ्या घरांची विक्री झाली होती तेवढे व्यवहार यंदा महिन्याच्या पहिल्या १७ दिवसांतच पूर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुनलेत यंदाच्या नोव्हेंबर महिन्यांत दुप्पट व्यवहारांची नोंद होईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या १२ वर्षांतील आँक्टोबर महिन्यांमध्ये झालेल्या मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहारांचा विक्रम यंदा मोडला गेला. गेल्या महिन्यांत तब्बल ७९२६ व्यवहारांची नोंद झाली होती. गेल्या नोव्हेंबर महिन्यांत ५५७२ व्यवहारांमधून सरकारला ४२८ कोटींचा महसूल प्राप्त झाला होता. यंदा महिन्यांतील पहिल्या १७ दिवसांतच ५५६८ व्यवहार नोंदणीकृत झाले असून उर्वरित १३ दिवसांमध्ये किमान ४ हजारांची नोंदणी होण्याची चिन्हे आहेत. महिनाअखेरीस एकूण व्यवहार ९ हजारांपर्यंत झेपावतील आणि आजवरचा एका महिन्यांतील सर्वाधिक व्यवहारांच्या नोंदणीचा विक्रम होईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मुद्रांक शुल्कातील सवलतींमुळे या महिन्यांतील सरकारी महसूल मात्र जेमतेम ३०० कोटींपर्यंतच पोहोचेल अशी चिन्हे आहेत. गेल्या महिन्यांत दस-याच्या मुहुर्तावर नोंदणी झालेल्या घरांचे रजिस्ट्रेशन सध्या होत आहे. दिवाळीच्या मुहुर्तांवरील घरांची नोंदणीसुध्दा येत्या महिन्याभरात होईल. राज्य सरकारने दिलेली मुद्रांक शुल्काची तीन टक्के सवलत डिसेंबर अखेरपर्यंतच आहे. त्यापूर्वी जास्तित जास्त व्यवहार नोंदविण्याचा प्रयत्न असेल.
‘ब्लँक’च्या व्यवहारांना वाव ?
केंद्र सरकारने रेडी रेकनर आणि अँग्रिमेंट व्हँल्यू यांच्यातील २० टक्क्यांपर्यंतची तफावत आयकर मुक्त केली आहे. त्यामुळे घरांच्या किंमती कमी होतील आणि व्यवहार वाढतील. परंतु, मुंबईतील रेडी रेकनरचे दरांपेक्षा आणि करार जास्त किंमतीचे असतात. परंतु, आता सरकारी सवलतीचा लाभ घेण्यासाठी आणि आर्थिक अरिष्ट दूर करण्यासाठी विकासक घरांचे करार कमी किंमतीत करतील आणि उर्वरित रक्कम ‘ब्लँक मनी’च्या माध्यमतून स्वीकारतील अशी माहितीसुध्दा विकासकांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे.
रोज ४७५ कोटींच्या घरांची विक्री
मुंबई शहरांत दररोज सरासरी ४७५ कोटी रुपयांच्या घरांची खरेदी विक्री होत असून गेल्या १७ दिवसांत ८१०० कोटी रुपये किंमतीच्या मालमत्तांचे व्यवहार झाले आहेत. गेल्या महिन्यांत दररोज सरासरी ३७४ कोटी रुपये किंमतीच्या घरांची विक्री झाली होती. रोज १०० कोटींचे अतिरिक्त व्यवहारांमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नोव्हेंबर महिन्यांत मालमत्तांच्या खरेदी विक्रीचे झालेले व्यवहार आणि महसूल
वर्ष | व्यवहारांची नोंदणी | महसूल (कोटींमध्ये) |
२०१५ | ४२२१ | २४९ |
२०१६ | ३८३८ | २३२ |
२०१७ | ६२३० | ४६३ |
२०१८ | ५२९० | ३६१ |
२०१९ | ५५७४ | ४२८ |
२०२० (१७ तारखेपर्यंत | ५५६८ | १६२ |
| ||