मुंबई : मुंबई महापालिका आणि सरकार यांनी केलेल्या सुचनांचे पालन करत मुंबईकरांनी दिवाळीदरम्यान कमीत कमी फटाके फोडण्यावर भर दिला. परिणामी ध्वनी प्रदूषण कमी झाले; आणि मुंबईकरांवर कौतुकाचा वर्षाव झाला. वायू प्रदूषण रोखण्यातही आपण यशस्वी झालो आहोत. मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरात फोडण्यात आलेल्या फटक्यांमुळे वायू प्रदूषणात वाढ झाल्याची नोंद करण्यात आली असली तरी ती गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. वांद्रे, खार दांडा, सांताक्रूझ, विलेपार्ले, माहीम, दादर, मरिन ड्राइव्ह आणि वरळी सी फेस या परिसरांचा यात समावेश आहे. दरम्यान, दिवाळीत वायू प्रदूषणाची नोंद झाली असली तरी याहून भयंकर म्हणजे दिवाळीत झालेल्या वायू प्रदूषणाच्या तुलनेत उर्वरित दिवसांत होणारे वायू प्रदूषण अधिक आहे. आणि यास येथील वाहने, कारखाने, रस्ते, धूळ, धूर आणि धूरके कारणीभूत आहे.
मुंबईत लक्ष्मीपूजनच्या दिवशी फटाके फोडण्याची परवानगी असतानाच भाऊबीज, पाडव्यादिवशी फटाके फोडण्यात आले. हे प्रमाण कमी असले तरी फोडण्यात आलेल्या फटक्यांमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणात भर पडली. विशेषत: बहुतांश ठिकाणी सुतळी बॉम्ब फोडण्यात येत असल्याने ध्वनी प्रदूषणात भर पडत होती. मात्र यंदा मुंबईकरांनी नवा आदर्श घालून दिला आहे. कमी फटाके फोडत ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी केले आहे. गेल्या कित्येक वर्षांतील दिवाळीशी तुलना करता यावर्षी दिवाळीत वायू प्रदूषण कमी झाले आहे. मात्र असे असले तरी मुंबईकरांनी याबाबत आणखी सहकार्य करत प्रदूषणावर मात केली पाहिजे, असे आवाज फाऊंडेशनचे म्हणणे आहे. दरम्यान, फटाके फोडल्यानंतर कित्येक तास वायू प्रदूषणात होणारी नेहेमीची आहे. वायू प्रदूषण हे सार्वजनिक आरोग्याचे संकट आहे. गेल्या दशकभरात झालेल्या ध्वनीप्रदूषणाच्या अभ्यासाप्रमाणेच वायू प्रदूषणाच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्यासाठी महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगर पालिका यांनी तपशीलवार अभ्यास करा, अशी विनंती या निमित्ताने करण्यात आली आहे.
------------------------
आवाज फाऊंडेशनने सिटीजन सायन्स प्रोजेक्ट अंतर्गत दिवाळीतील वायू प्रदूषणाची नोंद केली आहे. जानेवारी महिन्यातच हा प्रोजेक्ट हाती घेण्यात आला होता. दिवाळीदरम्यान प्रोजेक्टची आणखी अंमलबजावणी करण्यात आली. बहुतांश ठिकांणी आवाजाची पातळी मोजण्यात आली. साहजिकच जेथे जेथे कमी फटाके फोडण्यात आले तेथे कमी वायू प्रदूषणाची नोंद झाली आहे. आणि जेथे अधिक फटाके फोडण्यात आले आहेत तेथे अधिक प्रदूषणाची नोंद झाली आहे. परिणामी संपुर्ण मुंबईचे प्रदूषण मोजण्याऐवजी, त्याची नोंद दर्शविण्याऐवजी प्रत्येक ठिकाणी प्रदूषणाची नोंद घेतली तर भविष्यात प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.
- सुमैरा अब्दुलाली, आवाज फाऊंडेशन