मुंबई : दिवाळीचा आनंद घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. स्वत: देखील केवळ सोशल मीडिया, ई मेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून घरच्याघरी हा सण साजरा करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात की, कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही. लस जेव्हा येईल आणि आपल्यापर्यंत पोहचेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे, हे आपले प्राधान्य असले पाहिजे. हजारो डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस हे सणवार विसरून कोरोनाशी लढताहेत, सर्वांचा जीव कसा सुरक्षित ठेवायचा ते पाहताहेत. हे कृपया विसरू नका, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.