मुंबई - यंदा मॅजेस्टिक बुक डेपो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी पार्क येथे दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या ठिकाणी अंक खरेदी करणाऱ्यांना १० टक्के सवलतही देण्यात येत आहे.
शिवाजी पार्क येथील मनसेच्या दीपोत्सवासाठी संपूर्ण मुंबईतून नागरिक हजेरी लावत आहेत. याच दीपोत्सवाचे औचित्य साधत शिवाजी पार्क आणि राजा बडे चौक यांना जोडणाऱ्या रस्त्यावर दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरले आहे. ९ नोव्हेंबरपासून सुरू झालेले हे प्रदर्शन १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत खुल्या असलेल्या या प्रदर्शनाला संध्याकाळच्या वेळेत गर्दी वाढत असल्याचे मॅजेस्टिकच्या वतीने प्रदर्शनाची देखरेख करणाऱ्या सुधीर तेली यांचे म्हणणे आहे. प्रस्थापित दिवाळी अंकांना मागणी असून, यंदा सकारात्मक वातावरण असल्याचेही ते म्हणाले. या प्रदर्शनात जवळपास ३०० हून अधिक अंक ठेवण्यात आले आहेत. अद्यापही बरेच अंक येणार असल्याचेही तेली यांनी सांगितले.
खवय्यांसाठी लज्जतदार खाद्य जत्रा
विविध प्रकारच्या रुचकर आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांची चव खवय्यांना चाखता यावी यासाठी दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या समोरील बाजूस खाद्य जत्रा भरवण्यात आली आहे. प्रकाशचे थालीपीठ, आचरेकरांची मिसळ, वैद्यांची कुल्फी, खमंग बटाटे वडे, पाव भाजी, बिर्याणी आणि आणखी इतर बरेचसे पदार्थ नागरिकांचे लक्ष वेधत आहेत. पुस्तकप्रेमींना वाचनासोबतच खाद्य पदार्थांचाही आस्वाद घेता यावा यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.