मुंबई : मुंबई महापालिका आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाेड केली आहे. कर्मचाऱ्यांना २६ हजार रुपयांच्या बाेनसची घाेषणा करण्यात आली आहे.
बोनसबाबत पालिका प्रशासन निर्णय घेत नसल्याने, थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणाऱ्या पालिका कर्मचासाेबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. त्यात झालेल्या निर्णयानुसार २६ हजार रुपयांचा बोनस देण्याची घोषणा प्रशासनाने केली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ३,५०० रुपयांची वाढ मिळाली आहे.
१ लाख ०२ हजार कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार असून, पालिकेवर सुमारे २६५ कोटींचा भार पडेल. दिवाळी दोन दिवसांवर आली असताना, पालिकेकडून बोनस देण्यासंदर्भात निर्णय होत नसल्याने कर्मचारी नाराज हाेते.
मुंबई महानगरपालिकेच्या ९२ विनाअनुदानित खाजगी शाळांमध्ये शिकवणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मुंबई महानगरपालिकेने १०० टक्के अनुदान देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ याबाबत कार्यवाही करण्याचे शिक्षण विभागाला निर्देश दिले. त्याबाबत तातडीने कार्यवाही करत शिक्षण विभागाने महानगरपालिकेला या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात पत्र दिले आहे.
५ लाखांचा गटविमा गटविमा योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमा कंपन्यांच्या वाढीव प्रीमियममुळे २०१७ मध्ये योजना बंद झाली. त्यानंतर कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये प्रीमियमपोटी दिले जात होते. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार १ जानेवारी २०२४ पासून पुन्हा ही योजना सुरू होणार असून प्रीमियमपोटी प्रशासनाला वार्षिक २०० कोटी रुपये खर्च येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा समावेश योजनेत असल्याचे ॲड. प्रकाश देवदास यांनी सांगितले.
अशी आहे दिवाळी भेट!- २६,००० रु. पालिका/बेस्ट कर्मचारी
- ११,००० रु. आरोग्यसेविका
- बालवाडी शिक्षिका : एक महिन्याचे वेतन क्षयरोग नियंत्रण कर्मचारी : १ महिन्याचे वेतन