मुंबई: मुंबईसह देशभरात विविध सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. दिवाळी देखील फटाके फोडून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र यंदा मुंबईमध्ये गेल्या 15 वर्षातील सर्वात शांत दिवाळी साजरी झाली असल्याचा अहवाल समोर आला आहे.
फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली नाही. मात्र कमी आवाजाचे फटाके फोडणे आवश्यक व गरज देखील आहे. ध्वनिप्रदूषण कमी व्हावे यासाठी विविध संस्था विशेष उपक्रम राबवत जनतेला संदेश देत असतात. याचाच परिणाम यंदाच्या दिवाळीत दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. 2017च्या दिवाळीत 117.8 डेसिबल इतकी ध्वनी प्रदूषणाची नोद झाली होती. मात्र या वर्षी दिवाळीत ध्वनी प्रदूषणाची 112.3 डेसिबल इतकी नोंद झाली असल्याचं आवाज फाउंडेशनने स्पष्ट केले आहे.
सुतळी बॉम्ब सारख्या कानठळ्या बसविणारे फटाके यंदा कमी झाले आहे. यंदा फुलबाजा, सुरसुरी, चक्रीचाच दिवाळीत वापर करण्यात आला असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. गेल्या 15 वर्षापासून आवाज फाउंडेशनकडून ध्वनी प्रदूषणाची नोंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यतचा अनुभव पाहता यंदाची दिवाळी शांततेत झाली असल्याचे आवाज फाउंडेशनने सांगितले आहे.