मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सजगतेने साजरी करण्यासह पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करावयाची असून, आनंदाचा, प्रकाशाचा, रंगांचा सण असेलल्या दिवाळीत घरोघरी पुष्परचना, फुलांची तोरणं साकारली जातात. याच शृंखलेत मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने महापालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारालगत नवरंगांची उधळण करणारे पॅलेट साकारले आहे.
येथील पॅलेटमध्ये असणारे रंग हे केवळ फुलांनी साकारले असून मध्यभागी माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेचे बोधचिन्ह आहे. तर रंगांचे पॅलेट तयार करण्यासाठी पांढरा, लाल, पिवळा, गुलाबी, केशरी, फिकट हिरवा, दुरंगी आणि दुरंगी गुलाब असे गुलाबाचे प्रकार वापरण्यात आले आहेत. गर्द गुलाबी रंगाची कारनेशनची फुले वापरण्यात आली आहेत, अशी माहिती महापालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. या कलाकृतीसह सेल्फी काढण्यासाठी लगबग सुरु असून, यंदाची दिवाळी ही अधिकाधिक पर्यावरण पूरक पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन महापालिकेद्वारे पुन्हा एकदा करण्यात येत आहे.