बाजारपेठांत खरेदीचा ‘दीपोत्सव’; दुकाने सजली; दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 08:15 AM2021-11-01T08:15:06+5:302021-11-01T08:15:21+5:30
फराळाचे साहित्य खरेदीसाठी लालबागमध्ये गृहिणींनी गर्दी केली. चकली मसाले, तयार भाजणीचे पीठ, चिवड्यासाठी लागणारे पोहे, करंज्या-लाडू-शंकरपाळ्यांसाठीचे साहित्य आणि सुकामेव्याला विशेष मागणी होती.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवाळी अवघ्या काही तासांवर आल्याने मुंबईतील बाजारपेठांना दीपोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रांगोळ्या, पणत्या, आकाशदिव्यांसह सजावटीच्या साहित्यांनी दुकाने सजली असून, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. शहर आणि उपनगरातील प्रमुख बाजारपेठांसह लहान-मोठ्या मार्केटमध्ये अशीच स्थिती आहे.
दादर बाजारात रविवारी तुफान गर्दी पाहायला मिळाली. रस्ते, गल्ल्या, दुकाने ग्राहकांनी फुलून गेल्याचे चित्र होते. कपड्यांच्या दुकानांत सर्वाधिक गजबज होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साड्या, पंजाबी ड्रेससह पुरुषांच्या कपड्यांचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले. दादरला मध्यम गुणवत्तेची खण साडी आधी ७५० ते ८०० रुपयांना मिळायची आता ती एक हजार रुपयांवर पोहोचली आहे. तसेच जीन्स आणि शर्टही महागले आहेत.
फराळाचे साहित्य खरेदीसाठी लालबागमध्ये गृहिणींनी गर्दी केली. चकली मसाले, तयार भाजणीचे पीठ, चिवड्यासाठी लागणारे पोहे, करंज्या-लाडू-शंकरपाळ्यांसाठीचे साहित्य आणि सुकामेव्याला विशेष मागणी होती. चिवडागल्लीसह मसाला मार्केटमध्येही गर्दी दिसून आली. दिवाळीनिमित्त पणत्या, तोरणे व सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. रांगोळ्यांचे वैविध्यपूर्ण प्रकार आणि एलइडी दिव्यांमुळे बाजारावर रोषणाईचा साज चढल्याचे चित्र सायंकाळी पाहायला मिळत आहे. रांगोळीचे साचे, कृतिपुस्तके व ठशांची आवकही मोठ्या प्रमाणात झाली आहे. आकाशकंदिलांना सर्वाधिक मागणी आहे.
व्यापाऱ्यांसाठी आशादायक चित्र
nकापड व्यवसायाचे मुख्य अर्थगणित दिवाळीवर अवलंबून आहे. दरवर्षी ७० टक्क्यांहून अधिक व्यवसाय एकट्या दिवाळीत होतो. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे हिरमोड झाला. आता निर्बंध शिथिल केल्यामुळे आशेचा किरण जागृत झाला आहे.
nग्राहक बाजारात येऊ लागले आहेत. लसीकरण आणि सुरक्षा नियमांबाबत जागृती झाल्याने कोरोनाची धास्ती कमी झाली आहे. गेल्या आठ दिवसांतील बाजाराचा आढावा घेता दिवाळीत व्यवसाय पूर्वपदावर येण्याची आशा असल्याचे घाटकोपरमधील व्यापारी लक्ष्मीकांत चौधरी यांनी सांगितले.
‘एलईडी’ लाइटचे नवनवे प्रकार
स्टार कर्टन एलइडी दिवे, कर्टन स्ट्रिंग दिवे, खिडकीच्या पडद्यावरील दिवे, एलइडी नेट मेश स्ट्रिंग लाइटस्, एलइडी पिक्सेल स्ट्रिंग लाइटस्, एलइडी वॉटरप्रूफ स्ट्रिप रोप पाइप लाइट, १६ एलइडी स्ट्रिंग लाइटस्, प्लग-इन मेटल बॉल, असे नवनवे प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. कोरोना पूर्वकाळाच्या तुलनेत दिव्यांच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
सणासुदीच्या काळात राज्यभरातील शॉपिंग सेंटर्समध्ये आशादायक चित्र आहे. सध्याचा कल पाहता येत्या काळात व्यवसाय ८० ते ९० टक्क्यांनी पूर्वपदावर येण्याची अपेक्षा आहे. दिवाळीला पारंपरिक वस्त्रे, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स, विविध प्रकारच्या भेटवस्तू आणि अन्न, पेय पदार्थांच्या विक्रीत वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
- मुकेश कुमार, अध्यक्ष, शॉपिंग सेंटर्स असोसिएशन