दिवाळी उत्साहाला खरेदीचा साज, ग्राहकांसाठी विविध सवलती, स्वागतासाठी ठिकठिकाणी खास सजावट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 06:09 AM2023-11-06T06:09:12+5:302023-11-06T06:09:38+5:30
दिवाळी सण हा अवघा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
मुंबई : दिवाळी सणानिमित्त नागरिकांमध्ये रविवारी खरेदीचा उत्साह दिसून आला. शहर उपनगरातील दादर, लालबाग, क्राॅफर्ड मार्केट, लोहारचाळ, भुलेश्वर, मशीद बंदर, नटराज मार्केट या बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने भरलेले पाहायला मिळाले. कपडे, इलेक्ट्रॅानिक वस्तू, मिठाई यांसह इतर दुकानांमध्ये ग्राहकांच्या स्वागतासाठी खास सजावट केली होती, तसेच वस्तूंच्या खरेदीवर विविध सवलती देण्यात आल्या होत्या. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या चेहऱ्यावर खरेदी करताना वेगळाच आनंद होता. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमुळे या बाजारपेठांच्या परिसरात वाहतूक कोंडीही दिसून आली.
दिवाळी सण हा अवघा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्त मुंबईतील मुख्य बाजारपेठांमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने - चांदी , भेटवस्तू कपडे, मिठाई, आकाश कंदील, विद्युत माळा, पणत्या, रांगोळी या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी रविवारी दिवसभर मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिवाळी सणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने किंवा इतर वस्तू खरेदी करण्यास शुभ मानले जाते. या शुक्रवारी धनत्रयोदशीचा सण आला आहे. त्यामुळे ग्राहक शनिवारपासूनच बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करत आहेत. शहर उपनगरातील बाजारपेठांचा परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे.
सवलतींचा लाभ घेण्यासाठी गर्दी
कंदील, विद्युत माळा, पणत्या, रांगोळी या साहित्यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. यंदा बाजारात पारंपरिक आणि पर्यावरणपूरक असे विविध प्रकारात आकाश कंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. हे पर्यावरणपूरक कंदील खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा सर्वाधिक कल आहे.
कपड्यांच्या दुकानातही ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. सराफ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन, कपडे, मिठाई या दुकानांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना प्रसन्न वाटावे यासाठी उत्तम सजावट करण्यात आली आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तूंच्या खरेदीवर विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी या दुकानांमध्ये गर्दी करताना दिसून येत आहेत.