दिवाळीत निकृष्ट धान्य पुरवठा
By admin | Published: November 4, 2015 11:33 PM2015-11-04T23:33:02+5:302015-11-04T23:33:02+5:30
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमधील रेशन दुकानांमधून नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा केला जात आहे. गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात खडे व माती असून त्याचा
नवी मुंबई : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमधील रेशन दुकानांमधून नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा केला जात आहे. गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात खडे व माती असून त्याचा दर्जाही चांगला नाही. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून उत्सवात तरी चांगले धान्य द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तंूचे दर गगनाला भिडू लागले आहेत. तूरडाळ, मूगडाळीच्या किमती २०० रुपयांपर्यंत पोहचल्या आहेत. चनाडाळही शंभरीपर्यंत गेली आहे. डाळी व धान्याचे दरही आवाक्याबाहेर गेल्यामुळे घरखर्च भागविताना सामान्य नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील केशरी शिधापत्रिकाधारक नागरिक रेशनवरील धान्य घेवून उदरनिर्वाह करू लागले आहेत. दिवाळीमध्ये रेशनवर गहू, तांदळासह चनाडाळ, रवा व इतर वस्तूही मिळाव्या अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. शहरामध्ये बेलापूर ते ऐरोलीपर्यंतचा परिसर वाशी शिधावाटप कार्यालयाच्या अखत्यारीत असून दिघा परिसर ठाणे कार्यालयाच्या अंतर्गत येतो. दिवाळी जवळ आल्यामुळे रेशनवर धान्य वाटप करण्यास सुरवात झाली आहे. परंतु दिघामधील रामनगर व इतर ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या गव्हामध्ये मोठ्याप्रमाणात खडे आहेत. मातीचे ढेकळही त्यामध्ये आढळून येत आहेत. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.
दिघाप्रमाणेच घणसोली व नवी मुंबईमधील इतर काही ठिकाणी अशाचप्रकारे निकृष्ट दर्जाचे साहित्य वितरीत केले जात आहे. महागाई कमी करण्यात शासनास अपयश आले आहे. किमान रेशनवर दिले जाणारे धान्यतरी चांगल्या दर्जाचे दिले जावे अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
निकृष्ट धान्याविषयी तक्रार दुकानदारासह शिधावाटप अधिकाऱ्यांकडे करण्यास सुरवात केली आहे. खराब वस्तूंचा साठा परत घ्यावा व पुन्हा चांगल्या दर्जाचे साहित्य देण्यात यावे, नाहीतर आंदोलन करण्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. शिधावाटप अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
खडे साफ करण्याची कसरत
गव्हामध्ये प्रचंड प्रमाणात खडे असल्यामुळे महिलांना गहू साफ करताना खूपच वेळ जात आहे. चुकून खडे तसेच राहिले तर त्याचा आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. झोपडपट्टीमधील सर्वसामान्य नागरिक हतबल झाले असून याविषयी दाद कोणाकडे मागायची, अशा प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
वाशी शिधावाटप कार्यालयाच्या अखत्यारीत बेलापूर ते ऐरोलीपर्यंतचा परिसर येतो. या परिसरात जर निकृष्ट दर्जाचे साहित्य वितरीत झाले असून तर त्याविषयी तत्काळ माहिती घेतली जाईल. गहू व इतर वस्तू खूपच खराब असतील तर त्या बदलून देण्याविषयी प्रयत्न केले जातील. दिघा परिसर ठाणे कार्यालयाच्या अखत्यारीत असल्यामुळे त्या ठिकाणी संबंधित कार्यालयाने दखल घेतली पाहिजे.
- संजय कोळी, शिधावाटप अधिकारी, वाशी