एमएमआरडीए कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड- कर्मचाऱ्यांना ४२ हजार ३५० रुपये बोनस
By रतींद्र नाईक | Updated: November 9, 2023 22:04 IST2023-11-09T22:04:12+5:302023-11-09T22:04:23+5:30
यंदा बोनसच्या रकमेत १० टक्के वाढ करण्यात आली आहे.

एमएमआरडीए कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड- कर्मचाऱ्यांना ४२ हजार ३५० रुपये बोनस
मुंबई: एमएमआरडीएतील कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सन २०२२ -२०२३ या वर्षासाठी दिवाळीनिमित्त ४२ हजार ३५० रूपये सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली. बोनस सर्व संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यंदा बोनसच्या रकमेत १० टक्के वाढ करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान म्हणून ३८ हजार ५५० रुपये देण्यात आले होते. यावर्षी त्यात १० टक्क्यांनी वाढ करून सानुग्रह अनुदानाची रक्कम ४२ हजार ३५० रुपये इतकी करण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाची घोषणा करतेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की दिवाळी हा आनंदाचा सण असून यावर्षी दिवाळीचा गोडवा द्विगुणित व्हावा यासाठी आम्ही एमएमआरडीएच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी हा बोनस जाहीर केला आहे. एमएमआरडीएचे कर्मचारी हे राज्य सरकारच्या कुटुंबाचे एक सदस्य आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सानुग्रह अनुदानात १० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे या सरकारी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण होईल. हा आनंद बहुमोल आहे. एमएमआरडीएचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांनी सांगितले की, हे सानुग्रह अनुदान म्हणजे एमएमआरडीएच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची खास भेटच म्हणावी लागेल. एमएमआरडीएच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी या गोड बातमीनंतर अधिक आनंदात जाईलसानुग्रह अनुदानाची घोषणा केल्यानंतर एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या कर्मचाऱ्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.