Join us

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; एक महिन्याच्या पगारासह बोनस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 1:51 AM

परिवहन मंत्र्यांची घोषणा; दोन वाहकांच्या आत्महत्येनंतर घेतला निर्णय

मुंबई : राज्य परिवहन महामंडळातील ९७ हजार कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांच्या थकीत वेतनापैकी ऑगस्टचे वेतन व दिवाळी बोनस त्यांच्या बँक खात्यात आजपासून जमा केले जाईल. दिवाळीसाठी अग्रीम हवा असलेल्यांना तातडीने दिला जाईल. उर्वरित २ महिन्यांच्या वेतनापैकी एक वेतन दिवाळीपूर्वी दिले जाईल. बाकी वेतनासाठी शासनाकडे निधीची मागणी केल्ल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. 

पगार थकल्याने रत्नागिरी आगारातील पांडुरंग गडदे (३६, रा. बीड) या एसटी वाहकाने रविवारी रत्नागिरीत, तर जळगावमधील मनोज चौधरी या एस.टी कंडक्टरने सोमवारी आत्महत्या केली. आत्महत्येस महामंडळाची कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप चौधरी यांनी चिठ्ठीत केला आहे.  या घटनांनंतर संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलन केले. याची दखल घेत वेतन अदा केले.

कर्मचाऱ्यांचे वेतन का थकले ? 

लॉकडाऊनमुुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुलावर पाणी सोडावे लागले. याकाळातील इतर खर्च, जसे कर्मचाऱ्यांचे वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली. 

कोरोनामुळे सर्वसामान्यांनी सार्वजनिक वाहनातून प्रवास करणे बंद केल्याने रोज ६५ लाख प्रवासी वाहून नेणाऱ्या एसटीकडे सध्या केवळ १३ लाख प्रवाशांची चढ-उतार होत आहे.  यातून दररोज ७ कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे. टाळेबंदीपूर्वी दररोज २२ कोटी रुपये महसूल मिळत असे, असे परब यांनी सांगितले. 

टॅग्स :एसटी संप