मुंबई : देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी आपले सैनिक अहोरात्र तैनात असतात. म्हणूनच आपण सुरक्षित राहतो. कुठल्याही सणाच्या वेळी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा ताण वाढत असतो. सैनिकांना आपल्या घरी सण-उत्सव साजरे करता येत नाहीत. मात्र, दहिसरस्थित सुनीता व नरेंद्र केणी कुटुंबीय गेल्या चार वर्षांपासून जवानांसाठी दिवाळी फराळ तयार करून तो देशाच्या विविध सीमांवर पाठवित आहेत. केणी कुटुंबीयांनी नुकतेच सीमेवरील जवानांसाठी २ हजार ५०० दिवाळी फराळांचे डबे पाठविले.
बिमा नगर एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह अश्विनी साखळकर म्हणाल्या, बोरीवली (प.) येथील बिमा नगर एज्युकेशन सोसायटी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी शुभेच्छापत्रे बनविली व तीही या फराळाच्या डब्यांबरोबर पाठविण्यात आली.या वर्षी हिंदू नववर्ष स्वागत समिती (दहिसर)तर्फे ही योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. केणी दाम्पत्याचे सुपुत्र जय केणी हे सैन्यात आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून ते ही योजना आपल्या काही मित्र परिवारासोबत राबवत आहेत व यात लोकसहभाग वाढत आहे.लोकसहभागातून यंदा २ हजार ५०० फराळाचे डबे उधमपूर, तेजपूर, मणिपूर, लेह या भागामध्ये पाठविण्यात आले. तसेच पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान संचालितमणिपूर भागातील शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी ५०० फराळाचे डबे पाठविण्यात आले.