...अशीही साजरी होते दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 02:51 AM2018-11-12T02:51:32+5:302018-11-12T02:52:46+5:30
पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेश : प्लॅस्टिक बॉटलचा वापर झाडे लावण्यासाठी
मुंबई : काळाचौकी येथील लक्ष्मी विलास सोसायटीतील ओंकार राणे या तरुणाने टाकाऊपासून टिकाऊ वस्तूचा वापर करून यंदाची पर्यावरणपूरक दिवाळी साजरी केली. दक्षिण मुंबईत मोठमोठी गणेशोत्सव मंडळे असून दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक गणेश दर्शनाला येतात. या वेळी येथे मोठ्या प्रमाणावर कचरा होतो़ या कचऱ्यातील पाण्याच्या बॉटल्स जमा करून पर्यावरणपूरक प्रतिकृती तयार करण्यात आल्या. या प्रतिकृती दिवाळी सजावटीसाठी वापरून इमारतीची शोभा वाढविण्यात आली.
कचऱ्यातील तब्बल ४५०० पाण्याच्या बॉटल्स जमा करून त्या विविध रंगांनी रंगवून इमारतीचे सुशोभीकरण करण्यात आले. ओंकारने याआधीही बाटल्यांपासून काही शोभेच्या वस्तू बनविल्या आहेत. परंतु आता ओंकारने इमारतीच्या सजावटीसोबत सामाजिक संदेश आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने सोसायटीतील लहान मुलांना एकत्र करून बाटल्यांचा ट्रक, कार, रोबोट, ट्री हाउस आणि किल्ला इत्यादींच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. कलाकृतीतून पर्यावरणाचा जागरही केला आहे. नारळाच्या ७२० करवंट्यांपासून इमारतीच्या भिंती चांगल्या पद्धतीने सजविण्यात आल्या आहेत.
ओंकार राणे याने सांगितले की, ग्रीन नेचर प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सोसायटीतील सर्व मुले काम करत आहेत. रस्त्यावर पडलेल्या बॉटल्सचा वापर करून कलाकृती आम्ही तयार करतो. १ हजार ११८ बॉटल्स ट्रकसाठी वापरण्यात आल्या. या ट्रकमध्ये सोसायटीतील रहिवासी कचरा टाकू शकतात. याला कचरा गाडीही म्हणू शकतो. ६४० बॉटल्सची एक छोटी कार बनविण्यात आली आहे. या कारवर वृक्षारोपण करण्यात आले आहे.
दिवाळीमध्ये इमारतींना रोषणाई करण्यात येते. मात्र आम्ही भिंतीवर नारळाच्या करवंट्यांमध्ये वृक्ष लावून त्याचे तोरण लावले आहे. ४६० बॉटल्स वापरून एक ट्री हाउस बनविण्यात आले आहे. तसेच ११० बॉटल्सचा एक रोबोटही बनविण्यात आला आहे. इमारतीच्या दोन्ही बाजूला बॉटल्सचे पीलर उभे करण्यात आले असून ते ३०० ते ३७३ बॉटल्सचा वापरून प्रवेशद्वार बनविण्यात आले आहे, असेही ओंकारने सांगितले.
प्लॅस्टिक बाटल्यांचा किल्ला
सर्व जण मातीचा किल्ला साकारतात. मात्र ओंकारला यंदा दिवाळीसाठी माती मिळाली नाही. यासाठी त्याने महापालिकेच्या एफ/साऊथ विभागाकडे अर्जही दिला. परंतु त्यात समाधान न मिळाल्याने टाकाऊ बॉटल्सपासून किल्ला साकारण्यात आला आहे. यासाठी ३४३ प्लॅस्टिक बॉटल्सचा वापर केला गेला.