मुंबई - राज्याच्या मुख्य सचिवपदी डी.के. जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमित मलिक यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक सोमवारी (30 एप्रिल) निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन यांच्याकडे मुख्य सचिवपदाची सूत्रे सोपवण्यात आली. राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी मदत आणि पुनर्वसन विभागाच्या मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र जैन यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या गाडगीळ यांना डावलवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
मेधा गाडगीळ आणि डी.के.जैन हे दोघेही 1983 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 29 ऑगस्ट 1983 रोजी ते आयएएस अधिकारी म्हणून रुजू झाले. हे लक्षात घेता दोघे एकाच पातळीवर आहेत. मात्र, गाडगीळ यांची जन्मतारीख ही 4 ऑगस्ट 1959 आहे. त्या 31 ऑगस्ट 2019 ला सेवानिवृत्त होतील. जैन यांची जन्मतारीख 25 जानेवारी 1959 आहे आणि ते 31 जानेवारी 2019 ला सेवानिवृत्त होतील. कर्तबगार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून जैन यांची ओळख आहे.
दरम्यान, जैन यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्याने वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी यु.पी.एस. मदान यांच्याकडे दिली जाईल, असं सूत्रांनी सांगितलं. मदान हे सध्या एमएमआरडीएचे आयुक्त आहे.