प्रदीप शर्मासह पाच जणाचे डीएनए नमुने कलिना व पुण्यातील प्रयोगशाळेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:06 AM2021-06-23T04:06:00+5:302021-06-23T04:06:00+5:30
फेरा जिलेटिनचा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कारमायकल रोड स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेतील वादग्रस्त ...
फेरा जिलेटिनचा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कारमायकल रोड स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेतील वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याच्यासह पाच आरोपींचे डीएनए नमुने येथील कलिना व पुण्यातील फोरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. त्याच्या अहवालांतर त्यांच्या गुन्ह्यातील सहभागावर शिक्कामोर्तब होईल, असे सूत्रांनी सांगितले.
मनसुख हिरेन यांना हल्लेखोरांनी ज्या गाडीतून नेले होते, ती तवेरा मोटार एनआयएने जप्त केली. त्यात त्यांच्या हाताचे ठसे सापडले असून, त्याची पडताळणी करण्यासाठी ही चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल तातडीने मिळावा, यासाठी त्याचे नमुने दोन प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
एनआयएच्या अधिकाऱ्यांनी शर्मासह संतोष शेलार, आनंद जाधव, सतीश तिरुपती मोथकुरी ऊर्फ विक्की भाई व मनीष वसंत सोनी यांचे रविवारी डीएनए नमुने घेतले. त्यासाठी एका फॉरेन्सिक टीमला एनआयएच्या कार्यालयात आली होती. हिरेन यांना गाडीत मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्यांचा डीएनए अहवाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शर्माचे पंटर म्हणून काम करणारा संतोष लोहार व आनंद जाधव यांना गेल्या रविवारी अटक करण्यात आली. दोघे अनेक वर्षांपासून शर्माबरोबर काम करीत असून, त्याच्या पी.एस. फाउंडेशनमध्ये सक्रियपणे सहभागी आहेत. त्यांच्या अटकेनंतर पथकाने गुरुवारी शर्मा व त्याच्या अन्य दोन साथीदारांना अटक केली. शर्माने केलेल्या सूचनेनुसार चौघांनी हिरेन यांची हत्या केली होती. संबंधित तवेरा ही जाधव याच्या मालकीची असून, दोन महिन्यांपूर्वी मालाड परिसरातून जप्त करण्यात आली आहे. त्यातील वस्तूंवर हल्लेखोराच्या हाताचे ठसे व अन्य नमुने सापडले आहेत.
...................................