Join us

प्रदीप शर्मासह पाच जणांची डीएनए चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 4:06 AM

* तवेरातील नमुन्याची करणार पडताळणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्फोटक कार प्रकरणासह, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेतील वादग्रस्त ...

* तवेरातील नमुन्याची करणार पडताळणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : स्फोटक कार प्रकरणासह, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेतील वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याच्यासह पाचजणांची डीएनए चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. एनआयएने जप्त केलेल्या तवेरामध्ये मिळालेल्या डीएनएशी त्याची पडताळणी केली जाणार आहे.

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी शर्मा याच्यासह संतोष शेलार, आनंद जाधव, सतीश तिरुपती मोथकुरी उर्फ ​​​​विक्की भाई व मनीष वसंत सोनी यांचे डीएनए नमुने घेतले. त्यासाठी एका फॉरेन्सिक टीमला एनआयएच्या कार्यालयात बोलाविले होते. मनसुख हिरेनला गाडीत मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्यांच्या डीएनएचा अहवाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शर्माचे पंटर म्हणून काम करणारा संतोष लोहार व आनंद जाधव यांना गेल्या रविवारी अटक करण्यात आली आहे. दोघे अनेक वर्षांपासून शर्माबरोबर काम करीत असून, त्याच्या पी. एस. फाउंडेशनमध्ये सक्रियपणे जोडलेले आहेत. त्यांच्या अटकेनंतर पथकाने गुरुवारी शर्मा व त्याच्या अन्य दोघा साथीदारांना अटक केली. शर्माने केलेल्या सूचनेनुसार चौघांनी हिरेनची हत्या केली होती. संबंधित तवेरा ही जाधव याच्या मालकीची असून, दोन महिन्यांपूर्वी मालाड परिसरातून जप्त केली आहे. त्यामध्ये मिळालेल्या वस्तूवर हिरेनचे डीएनएचे नमुने मिळाले आहेत. त्याचबरोबर इतरांचेही हाताचे ठसे व अन्य नमुने मिळाले आहेत. त्याच्याशी या पाचजणांच्या डीएनए नमुन्यांची पडताळणी होणार आहे.