Join us

'देहविक्री करणाऱ्या महिलांची DNA टेस्ट केल्यास अपत्याला वारसाहक्क मिळू शकतो'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 6:23 PM

अनौरस मुलांचा अधिकार काढून घ्यायचा कोणालाही अधिकार नाही तो त्याला मिळालाच पाहिजे.' - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : देहविक्री करणाऱ्या महिलेने DNA टेस्टची मागणी केली तर तिला ती करून द्यावी याकरिता शासनाने त्या स्त्रीला मदत करावी यातून भविष्यात स्त्रियांवर होणारे अत्याचार रोखले जातील, असे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

आज मुंबई येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘देहविक्री करणाऱ्या महिला व त्यांच्या मुलांसाठी कायदेशीर, आरोग्य, व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याकार्यक्रमात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रीय महिला आयोग सदस्या मीनाक्षी नेगी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर व डॉ प्रशांत नारनवरे आयुक्त महिला बाल विकास आदी मान्यवर उपस्थित होते.

गोऱ्हे म्हणाल्या, राज्यातील जेजुरी येथे महिलांचा वापर मुरळीप्रथेमध्ये होताना आपण बघतो. पण आज त्यांची मुले त्यांना हे कृत्य करण्यापासून रोखत असल्याचे दिसते. हा सकारात्मक बदल त्यांच्या मुलांना मिळालेल्या शिक्षणामुळे घडून येत आहे. यासोबतच देहविक्री करणाऱ्या महिलांसाठीच्या घेतलेले सरकारचे निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचल्यास त्या महिलांची उमेद वाढेल. महाराष्ट्र पोलिसांचे कार्य चांगले असून अशा महिलांच्यासंदर्भात एक प्रमाणित संकलन प्रक्रिया (S.O.P.) तयार केल्यास त्याबाबतची मदत करण्यास आणखीन सोपे होईल.

देहविक्री करणाऱ्या महिलेने DNA टेस्टची मागणी केली तर तिला ती करून द्यावी. याकरिता शासनाने त्या स्त्रीला मदत करावी. यातून भविष्यात होणारे अत्याचार रोखले जातीलच शिवाय त्यांच्या अपत्यांना त्या संबंधित पुरुषाच्या वारसा हक्कामध्ये अधिकार मिळेल. यातून असे कृत्य करण्यापासून पुरुष-परावृत्त होतील आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होईल, असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. अशा अनौरस मुलांचा अधिकार काढून घ्यायचा कोणालाही अधिकार नाही तो त्याला मिळालाच पाहिजे असे देखील डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

महिलांनी त्यांच्या समस्येसंदर्भात न घाबरता पोलीस स्टेशनला यावे. पोलीस प्रशासन आपल्याला नक्की मदत करेल. तुम्हाला जी काय मदत लागेल ती पोलिसांकडून केली जाईल. कोरोना काळात देखील पोलिसांनी उत्तम कार्य केलेलं आहे. प्रत्येक वेळी कायद्याने जाण्याची आवश्यकता नाही, मानवतेच्या भावनेने कार्य करणे गरजेचे आहे. आम्ही आपल्यासोबत आहोत असे आश्वासन फणसाळकर यांनी यावेळी दिले.

टॅग्स :शिवसेना