संजय गांधी उद्यानातील वन्यप्राण्यांची डीएनए चाचणी; महाराष्ट्र ठरणार देशातील पहिले राज्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 04:20 AM2019-12-11T04:20:10+5:302019-12-11T06:05:13+5:30
प्रयोगशाळा उभारणारा महाराष्ट्राचा वन विभाग देशात पहिला ठरला आहे.
मुंबई : वन्यप्राण्यांची डीएनए चाचणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाने बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात स्वत:ची प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अशी प्रयोगशाळा उभारणारा महाराष्ट्राचा वन विभाग देशात पहिला ठरला आहे. यासाठी आवश्यक असलेला ३ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी उद्यान व्यवस्थापनाला उपलब्ध झाला असून ही प्रयोगशाळा उभारण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे उद्यानाचे मुख्य वन संरक्षक अन्वर अहमद यांनी सांगितले.
मानव वन्यजीव संघर्षात विशेषत: जेव्हा यात मनुष्य मृत्यूच्या घटना घडतात तेंव्हा घटनेच्यावेळी कारणीभूत प्राण्याला ओळखून त्याला जेरबंद करणे अत्यंत महत्वाचे ठरते. आतापर्यंतअशा वन्य प्राण्याची ओळख पटविण्यासाठी पायांचे ठसे किंवा शरीरावरील ठिपके/पट्टयांचा वापर केला जात होता.
आता प्राण्यांची तंतोतंत ओळख होण्याकरिता प्राण्यांची डीएनए चाचणी करणे आवश्यक ठरत असल्याची बाब लक्षात घेऊन वन विभाग स्वत:ची प्रयोगशाळा उभारणार आहे. सद्यस्थितीत डी.एन.ए चाचणी करण्यासाठीचे नमुने हैदराबाद व भारतीय वन्यजीव संस्थान डेहराडून यांच्याकडे पाठविले जातात. या चाचणीचे परिणाम मिळण्याकरिता अनेक महिने वाट पहावी लागते.
दरम्यान मानव वन्यजीव संघर्षात कारणीभूत ठरलेल्या प्राण्याची तंतोतंत ओळख निश्चित न झाल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चेकलम ११ व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार प्राण्याला जेरबंद करण्याचे आदेश काढण्यास अडचण निर्माण होते. डीएनए चाचणीचे परिणाम लवकर प्राप्त व्हावेतयाकरिता वन विभागात स्वतंत्र प्रयोगशाळा स्थापन करणे अत्यंत आवश्यक होते.