Join us

‘ज्ञानदेव यांचा दावा म्हणजे मुलाचे बेकायदेशीर कृत्य लपविण्याचा प्रयत्न’; नवाब मलिक यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 6:58 AM

वानखेडे यांनी केलेल्या अंतरिम मागण्यांना विरोध करताना मलिक यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे सरकारने चौकशी सुरू केली आहे.

मुंबई : मुलाने केलेले बेकायदेशीर कृत्य लपविण्यासाठी एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्या वडिलांनी माझ्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ज्ञानदेव वानखेडे यांच्या मानहानी दाव्यावर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

वानखेडे यांनी केलेल्या अंतरिम मागण्यांना विरोध करताना मलिक यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे सरकारने चौकशी सुरू केली आहे. खंडणी प्रकरण समोर आल्यावर क्रुझ ड्रग्ज प्रकरण व अन्य काही प्रकरणांचा तपास दिल्ली एसआयटीकडे वर्ग करण्यात आला.

समीर वानखेडे यांचा जन्म मुस्लीम कुटुंबात झाला आहे. त्यांनी अनुसूचित जातीचे असल्याचा खोटा दावा करून सरकारी नोकरी मिळवल्याचा दावा नवाब मलिक यांनी केल्यानंतर ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांना समीर वानखेडे व कुटुंबातील अन्य सदस्यांविरोधात काहीही विधान करण्यापासून कायमस्वरुपी मनाई करण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला.

सोमवारच्या सुनावणीत न्यायालयाने मलिक यांना मंगळवारपर्यंत  दाव्यावर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश देत बुधवारी सुनावणी ठेवली. हे प्रकरण अपवादात्मक प्रकरण आहे. केवळ युक्तिवादाशिवाय जन्म प्रमाणपत्रासंबंधी एकही कागदोपत्री पुरावा दाखल करू शकले नाहीत. हे प्रमाणपत्र मुंबई महापालिकेने दिले. जर मुंबई महापालिकेने चूक केली तर दावेदाराने किंवा समीर वानखेडे यांनी ती चूक पालिकेच्या निदर्शनास आणून देऊन योग्य ती पावले उचलायला हवी होती, असे मलिक यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. वानखेडे यांनी तथ्याचा विपर्यास करून आणि खोटे बोलून माझ्याविरुद्ध आदेश मिळवण्याचा आणखी एक कमकुवत प्रयत्न केला आहे, असा दावा मलिक यांनी केला आहे. 

वडिलांनी सज्ञान मुलांच्यावतीने न्यायालयात दावा दाखल केला आहे; मात्र तसे करण्यापूर्वी त्यांनी दिवाणी दंडसंहिता, १९०८ अंतर्गत न्यायालयाची पूर्वपरवानगी घ्यायला हवी होती. कायद्याने परवानगी घेणे बंधनकारक आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून समीर वानखेडे यांनी केलेले बेकायदेशीर कृत्य उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला. आता वेगवेगळ्या तपास यंत्रणा दावेदाराच्या मुलाने केलेले बेकायदेशीर कृत्याबाबत तपास करण्यास सुरुवात केली आहे. मला राज्यघटनेने बहाल केलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. दावेदार आपल्या मुलाचे बेकायदेशीर काम लपविण्याचा प्रयत्न करत आहे, असे मलिक यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

टॅग्स :समीर वानखेडेनवाब मलिकअमली पदार्थ