Join us  

चांगले काम करा; अन्यथा बिल्डरांची खैर नाही! ३१ ऑक्टोबपर्यंत सूचना पाठवण्याचे महारेराचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 9:20 AM

रिअल इस्टेटमधील गुणवत्ता आश्वासन  अहवालाचा आराखडा विकसित करण्यासाठी सर्व बिल्डरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थांना पत्र लिहून आता त्यांच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत.

मुंबई :  घरबांधणीत राहिलेल्या त्रुटी दुरुस्त करण्याची सोय असल्याने ग्राहकहित जपले जात असले तरी अशी वेळ येऊ नये म्हणून त्याआधीच बांधकामांबाबत कार्यपद्धती ठरवून उत्तम गुणवत्तेच्या कामासाठी महारेराने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, रिअल इस्टेटमधील गुणवत्ता आश्वासन  अहवालाचा आराखडा विकसित करण्यासाठी सर्व बिल्डरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थांना पत्र लिहून आता त्यांच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत.अतिरिक्त खर्च करून दोष दूर करत बसण्यापेक्षा अशा तक्रारी उद्भवू नये यासाठी आधीच बांधकाम पातळीवर काय करता येईल?  कशी काळजी घेता येईल? त्यासाठी  कार्यपद्धती कशी ठरवायची? त्यात कुठल्या बाबींचा समावेश ठेवायचा? त्यासाठीचे मापदंडही कसे ठरवायचे? याबद्दल महारेराकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत सूचना पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार महारेराने बिल्डर संस्थांना पत्र दिले आहे.

अनेकजण आयुष्यभराची कमाई घरखरेदीत गुंतवतात. घर ताब्यात आल्यानंतर ५ वर्षापर्यंत विनाखर्च तक्रारी सोडविण्याची जबाबदारी बिल्डरांची असते. तरीही अशावेळी घर ताब्यात आल्यानंतर अडचणींना सामोरे जायला लागू नये, यासाठी गुणवत्तापूर्ण बांधकामांचा आग्रह धरला आहे. म्हणून कार्यपद्धती आणि मानके ठरविण्यात येत आहेत. यातून ग्राहकहित जपले जाईल.- अजोय मेहता, अध्यक्ष, महारेरा 

- सूचना आल्यानंतर महारेरा त्यावर सल्लामसलत पेपर तयार करून तो सर्वांच्या सूचनांसाठी जाहीर करेल. 

- पेपर जाहीर हाेताच त्याबाबत पुढील कारवाई केली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

  

टॅग्स :मुंबईसरकार