‘फॉरेन्सिक एक्स्पर्ट’मार्फत शवविच्छेदन करा
By admin | Published: February 13, 2016 01:56 AM2016-02-13T01:56:29+5:302016-02-13T01:56:29+5:30
हरियाणा पोलिसांच्या चकमकीत मारल्या गेलेल्या संदीप गदोली यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यात ही बनावट चकमक असून, या प्रकरणी
मुंबई : हरियाणा पोलिसांच्या चकमकीत मारल्या गेलेल्या संदीप गदोली यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यात ही बनावट चकमक असून, या प्रकरणी महानगर दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. ही सुनावणी सोमवारी उच्च न्यायालयात होणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने दिली.
गदोलीचे वकील तन्वीर निझाम यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, गदोलीवर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न असा गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्याच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, जर गदोलीची हत्या गुडगाव पोलिसांनी केली असेल, तर मुंबई पोलीस त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ का करीत आहेत? या प्रकरणाच्या एफआयआरची प्रत अद्याप का पोलिसांनी अडवून ठेवली आहे?
ही एफआयआरची प्रत आम्हाला देण्यात यावी; तसेच गदोलीचे शवविच्छेदन हे एखाद्या फॉरेन्सिक एक्स्पर्टकडून करवून घेण्यात यावे. त्याचबरोबर मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. कायद्यानुसार या प्रकरणाची चौकशी महानगर दंडाधिकाऱ्यांमार्फत व्हावी, अशी मागणी या याचिकेमार्फत आम्ही केल्याचे ते म्हणाले.
गदोलीचे मोठे भाऊ कुलदीप सिंग यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी त्यांची आई मूर्तीदेवी यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. ज्यात गदोलीच्या जिवाला धोका असल्याचे त्यांनी सांगितले होते. हरियाणामध्ये गदोली कुटुंबीयांचे त्या ठिकाणच्या काही लोकांशी वैमनस्य आहे. त्यांनीच गुडगाव पोलिसांशी हातमिळवणी करून गदोलीची हत्या कारविल्याचा त्यांचा आरोप आहे. गदोलीला अगदी जवळून गोळ्या मारण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गुडगाव पोलिसांनी शस्त्रासह गदोलीच्या घरी जाऊन त्याचे एन्काउंटर करण्याची धमकी
यापूर्वी दिल्याचा आरोप कुटुंबीय करीत
आहेत. ज्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग तसेच अन्य पुरावे त्यांच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
पाच कोटींची सुपारी
गुडगाव पोलीस आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ५ कोटी रुपये दिले. ज्या बदल्यात ही चकमक करून आमच्या भावाला ठार मारण्यात आल्याचे कुलदीप यांचे म्हणणे आहे.
ज्या हॉटेलमध्ये ही चकमक झाली त्या हॉटेलच्या रिसेप्शनवर असलेल्या व्यक्तीनेही या पोलिसांना हटकले होते. जेव्हा त्यांनी या हॉटेलचे सीसीटीव्ही फोडले.
८ बाय ९च्या खोलीत चकमक झाल्याचे पोलीस म्हणत आहेत, पण एकही गोळी भिंतीत अथवा खोलीत का सापडली नाही? माझ्या भावाला चार गोळ्या लागल्या. ज्यातील तीन त्याच्या छातीत तर एक गोळी पायाला लागली आहे.
हॉटेल चालकाकडून गोळीबाराची माहिती
गुडगाव पोलिसांनी चकमकीबाबत स्थानिक पोलिसांना कळवलेच नव्हते. गदोलीला ठार मारल्यानंतरदेखील पोलीस घटनास्थळाहून पळ काढण्याच्या तयारीत होते. मात्र वेळीच हॉटेल चालकाने स्थानिक पोलिसांना या ठिकाणी गोळीबाराचा आवाज येत असल्याचे कळविले आणि ते सापडले, असेही त्यांनी आरोपात म्हटले आहे.