विकास मंडळांचे कार्य स्वत:पुरतेच आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 04:35 AM2018-04-24T04:35:20+5:302018-04-24T04:35:20+5:30
राज्यपालांचा सवाल : जनतेपर्यंत जाण्याचा सल्ला
विशेष प्रतिनिधी ।
मुंबई : राज्याच्या विविध विभागांना न्याय देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली विकास मंडळांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचत नाही, अशी नाराजी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आज व्यक्त केली. ‘तुम्ही केलेला अभ्यास, त्याचे अहवाल, विभागाच्या विकासासाठी दिलेले योगदान लोकांपर्यंत पोहोचवा,’ असा सल्लाही त्यांनी दिला.
विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ यांची संयुक्त बैठक राजभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्या वेळी राज्यपाल बोलत होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुमित मलिक, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्यासह विकास मंडळांचे अध्यक्ष, सचिव, सदस्य उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले की, काही भागात अनुशेष दूर करण्यासाठी निधीचे समान वाटपाचे जे सूत्र आहे, ते बदलण्याची गरज असून, विभागनिहाय निधी वाटपासाठी आवश्यक त्या सुधारणा नियोजन विभागाने येत्या तीन महिन्यांत कराव्यात. विकास मंडळांना मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी रिक्त जागा भरण्यासाठी नियोजन विभागाने प्रक्रिया हाती घ्यावी.
मुख्यमंत्री या वेळी म्हणाले, की, विदर्भ, मराठवाडा भागातील सिंचन, आरोग्य, शिक्षण, कृषी या क्षेत्रातील विकासासाठी तिन्ही विकास मंडळांनी विशेष लक्ष केंद्रित करून काम करण्याची गरज आहे. तीनही विकास मंडळांनी केलेल्या सूचनांच्या अभ्यास आणि समन्वयासाठी एक समिती असणे आवश्यक आहे.
या वेळी नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी विदर्भ विकास मंडळाचे, औरंगाबाद विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी मराठवाडा विकास मंडळाचे तर कोकण विभागीय आयुक्त जगदिश पाटील यांनी उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे सादरीकरण केले. या वेळी मंडळाचे सदस्य डॉ. आनंद बंग, कपिल चंद्रयान, शंकर नागरे यांनी आरोग्य, शिक्षण, सिंचन याबाबत केलेल्या सविस्तर अभ्यासाचे सादरीकरण केले.
बैठकीस राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी, महाराष्ट्र जलसंपदा प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन आदी उपस्थित होते.