तुमच्या हलगर्जीपणाची शिक्षा कष्टकऱ्यांनी भोगायची का? तेव्हा शरद पवारांचा पारा चढला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 12:47 PM2021-08-15T12:47:14+5:302021-08-15T12:48:08+5:30

सिन्नर येथे गरिब आणि कष्टकऱ्यांनी पै न पै जमा करुन जागा खरेदी केली होती. या जागेत कष्टकऱ्यांच्या लेकरांसाठी शाळा उभारण्याचं त्यांचं स्वप्न होतं. मात्र, शासकीय लालफितीत ही शाळा उभारणीची प्रक्रिया रखडली.

Do hard workers pay the price for your negligence? Then Sharad Pawar's mercury went up, jitendra awhad facebook post | तुमच्या हलगर्जीपणाची शिक्षा कष्टकऱ्यांनी भोगायची का? तेव्हा शरद पवारांचा पारा चढला

तुमच्या हलगर्जीपणाची शिक्षा कष्टकऱ्यांनी भोगायची का? तेव्हा शरद पवारांचा पारा चढला

Next
ठळक मुद्देअखेर, आज या शाळेच्या उभारणीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. मात्र, अडथळ्यांची शर्यत पार करुन अनेकांच्या मदतीने, शरद पवारांच्या प्रयत्नाने आणि आव्हाड यांच्या पाठपुराव्याने हा दिवस उजाडल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

मुंबई - राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन आजोबांच्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यासोबतच, आज सिन्नर येथे एका शाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन आव्हाड यांच्याहस्ते झाले. त्यावेळी, या भूमिपूजनाला लागलेला विलंब, या शाळेच्या उभारणीसाठी आलेल्या अडचणींचा लेखाजोखाच त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन मांडला आहे. तसेच, प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरुन खासदार शरद पवार यांनी कशारितीने हे काम सोप्पं केलं, हेही त्यांनी सांगितलं आहे. 

सिन्नर येथे गरिब आणि कष्टकऱ्यांनी पै न पै जमा करुन जागा खरेदी केली होती. या जागेत कष्टकऱ्यांच्या लेकरांसाठी शाळा उभारण्याचं त्यांचं स्वप्न होतं. मात्र, शासकीय लालफितीत ही शाळा उभारणीची प्रक्रिया रखडली. अखेर, आज या शाळेच्या उभारणीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. मात्र, अडथळ्यांची शर्यत पार करुन अनेकांच्या मदतीने, शरद पवारांच्या प्रयत्नाने आणि आव्हाड यांच्या पाठपुराव्याने हा दिवस उजाडल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. त्यांच्या स्वातंत्र्याची एक वीट!, अशा मथळ्याने आव्हाड यांनी ही पोस्ट लिहिली आहे.  

आव्हाड यांची फेसबुक पोस्ट
 

त्यांच्या स्वातंत्र्याची एक वीट!

रेल्वे सुरु झाली आणि आमचा वंजारी समाज मोठ्या संख्येने मुंबईत आला. शिक्षण नाही, गावोगाव भटकूनही शेतमजुरीवर पोट भरत नाही. तेव्हा शारीरिक कष्टच करायचे, तर निदान एका जागी स्थिर होऊन ते करावे असा सूज्ञ विचार त्यांनी गेला असावा. मुंबईत आल्यावर कुणी हातगाड्या चालवल्या तर कोणी रेल्वे स्टेशनवर हमाली केली. माझे आजोबा हे त्यापैकीच एक. अनेक वर्ष ते बॉम्बे सेंट्रल रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सामानाची ने आण करत होते आणि अनेक वर्ष फलाटावरच राहिले.

मुद्दा वेगळा आहे. आपले हे हाल शिक्षण नसल्यामुळे झाले हे या लोकांना कळलं. मुंबईतील पांढरपेशा वर्ग त्यांनी जवळून पाहिला. आपल्याला ज्या यातना सोसाव्या लागल्या त्या आपल्या पुढच्या पिढ्यांना भोगाव्या लागू नयेत म्हणून या कष्टकरी लोकांनी सिन्नरमध्ये शाळा काढायचं ठरवलं. पैसे दोन पैसे आपसात गोळा करून त्यांनी सिन्नरमध्ये काही एकर जागा घेतली. पण आपापल्या आयुष्याचा गाडा ओढण्यात हे लोक इतके व्यग्र होते की शाळेचं घोडं फक्त जमीन घेण्यावरच अडलं. वसंतराव नाईक शिक्षण संस्थेशी संलग्न असलेल्या या प्रस्तावित शाळेची जमीन कित्येक वर्ष ओसाड माळरानासारखी पडून राहिली.

काही लोकांनी उत्साह दाखवून शाळेच्या बांधकामाला सुरुवात करायचा प्रयत्न केला तेव्हा दिसलं की दरम्यानच्या काळात जमिनीवर विजेच्या खांबांचं बांधकाम झालंय आणि वरून वीजवाहक तारा गेल्या आहेत. ते हलवणं हे महाकठीण काम होतं. प्रकरण मा. शरद पवार यांच्याकडे गेलं. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलं. जिल्हाधिकाऱ्यांनी खास नोकरशाहीची उडवाउडवी उत्तरं दिली तेव्हा साहेबांनी त्यांच्या खास शैलीत त्यांचा रुबाब उतरवला. मा. दिलीप वळसे-पाटील यांना सूचना देऊन साहेबांनी खांब हलवायला सांगितले. अर्थातच खांब हलवले गेले. पण आर्थिक भरपाई करायचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा हात वर केले आणि शिक्षण संस्थेने हा भार उचलावा अशी भूमिका घेतली. 
यावेळी साहेबांच्या करारीपणाचा पुनश्च प्रत्यय आला. "मुळात एखाद्या संस्थेच्या जमिनीवर तिला न विचारता दुसरं कुठलं बांधकाम होतं याचा अर्थ तुम्ही काय झोपा काढत होतात? ही कष्टकऱ्यांनी रुपया दोन रुपये काढून अक्षरशः घामाच्या पैशातून घेतलेली जमीन आहे. तुमच्या हलगर्जीपणाची शिक्षा सुद्धा त्यांनीच भोगायची का", अशी कणखर भूमिका साहेबांनी घेतली. 

वास्तविक ह्या 14/15 वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत. हे प्रकरण साहेबांपर्यंत नेण्यात माझा पुढाकार होता हे वेगळ्याने सांगायची गरज नाही किंवा त्यातून माझा दिंडोरा पिटायची सुद्धा माझी इच्छा नाही. पण ते आत्ता सांगायचं कारण एवढंच की आज सिन्नरमध्ये या शाळेच्या बांधकामाला माझ्या हस्ते सुरुवात होत आहे. माझ्या आजोबांनी त्या काळात ही जमीन विकत घ्यायला किती वर्गणी दिली होती हे मला माहीत नाही. ते महत्त्वाचं सुद्धा नाही. महत्वाचं हे आहे की गेली कित्येक दशकं त्या पिढीने पाहिलेलं एक शाळेचं स्वप्न आज साकार होत आहे. त्याचा साक्षीदार मी असेन हेच मला पुरेसं आहे. सामानाची ओझी वाहून, किंवा हातगाड्या ओढून आपले गुडघे आणि खांदे झिजवून मरण पावलेल्या त्या वंजारी समाजाच्या पिढीला आज मी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहीन. अमानवी शारीरिक कष्टातून, दुय्यम दर्जाच्या वागणुकीतून त्यांना स्वातंत्र्य हवं होतं. त्याची एक वीट आज रचली जाईल.
वास्तविक, आजच्या समारंभाला पवार साहेब उपस्थित राहणं हे जास्त औचित्यपूर्ण ठरलं असतं. पण ते शक्य झालं नाही. तथापि, या सरस्वतीच्या मंदिराच्या बांधकामाचा मार्ग त्यांनी मोकळा करून दिला याची सिन्नरच्या गोरगरीब जनतेला आणि इथल्या प्रत्येक विटेला आठवण राहील.

Web Title: Do hard workers pay the price for your negligence? Then Sharad Pawar's mercury went up, jitendra awhad facebook post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.