‘मी टू’च्या तक्रारी समितीकडेच करा; बीएआरसीमध्ये सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 05:44 AM2018-10-18T05:44:30+5:302018-10-18T05:45:01+5:30
उपआस्थापना अधिकारी यांचे परिपत्रक
- यदु जोशी
मुंबई : भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रात (बीएआरसी) कार्यरत महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या लैंगिक छळाची तक्रार थेट वरिष्ठांकडे न करता बीएआरसीमधील महिला तक्रार निवारण समितीकडेच करावी, अशी सक्ती करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
बीएआरसीचे उपआस्थापना अधिकारी के.के.डांगे यांच्या सहीने अलिकडेच एक परिपत्रक काढले आहे. काही महिला कामाच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारी थेट पंतप्रधानांसह अन्य वरिष्ठांकडे करीत असल्याचे समोर आले. बीएआरसीमधील महिला कर्मचाºयांनी अशी तक्रार असल्यास ती महिला तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष वा सदस्य यांच्याकडेच करावी. तक्रार करण्याचा हा फोरम सोडून अन्यत्र तक्रार करु नये, असे या परिपत्रकात बजावण्यात आले आहे.
देशभरात ‘मी टू’चे वादळ घोंघावत असताना आता बीएआरसीमधील महिला सेल/तक्रार निवारण समितीची फेररचना करण्यात आली आहे. देशभरातील महिला आज लैंगिक छळाबाबत विविध फोरमवर व्यक्त होत असताना बीएआरसीमध्ये मात्र समिती सोडून तक्रार न करण्यास सांगून महिलांचा आवाज दाबला जात असल्याची चर्चा आहे. कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांच्या समितीसमोर सहकाºयांविरुद्ध तक्रार घेऊन जाण्यास किती महिला धजावतील हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.