मुंबईकरांमध्ये पुरेशा अँटिबॉडीज आहेत का? दोन दिवसांत सिरो सर्वेक्षणाचा अहवाल येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 05:23 AM2022-12-27T05:23:27+5:302022-12-27T05:23:36+5:30
सिरो सर्वेक्षण म्हणजे काय?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्या कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत कमी असली तरी गेल्या आठवड्यापासून चीनमध्ये कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या पाहून केंद्र सरकाने सर्व आरोग्य यंत्रणांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकने ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केलेल्या सिरो सर्वेक्षणाचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. येत्या दोन दिवसात हा अहवाल येणार असून त्यानंतर मुंबईकरांच्या शरीरात कोरोना विरोधातील प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) आहेत की नाहीत याचा उलगडा होणार आहे.
कोरोना महासाथ जोमात असताना महापालिकेने सिरो सर्वेक्षण चालूच ठेवले होते. विशेष म्हणजे कोरोना विरोधातील लसीचे दोन डोस मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात घेतले आहेत. तसेच काही प्रमाणात नागरिकांनी बूस्टर डोसही घेतला आहे. त्यामुळे या लसीकरणामुळे या आजाराच्या विरोधात लढण्याची प्रतिपिंडे असण्याची शक्यता आहे. या प्रतिपिंडांमुळे आजाराचा फारसा त्रास नागरिकांना जाणवत नाही.
याप्रकरणी, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, सिरो सर्वेक्षणाचा अहवाल येत्या दोन दिवसात येणार आहे. सध्या अहवाल तयार करण्यासाठी गरजेचे असणारे विश्लेषणाचे काम सुरू आहे. तो अहवाल आल्यानंतर सादर केला जाईल.
सिरो सर्वेक्षण म्हणजे काय?
- कोरोना विषाणूच्या विरोधातील किती लोकांमध्ये प्रतिपिंडे तयार झाली हे या सर्वेक्षणातून स्पष्ट होते. ज्या व्यक्तींच्या शरीरात प्रतिपिंडे आढळतात या अशा व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. तसेच या व्यक्तीमध्ये संसर्ग पसरविण्याचे प्रमाण कमी असते.
- साथीच्या आजाराच्या काळात गेल्या दोन वर्षात आरोग्य यंत्रणेने अशा पद्धतीने सिरो सर्वेक्षणाचे आयोजन केले होते. स्थानिक पातळीवर महानगरपालिका, राज्य पातळीवर सार्वजनिक आरोग्य विभाग, तर देश पातळीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अशा पद्धतीचे सर्वेक्षण करत असतात. यामुळे या आजाराच्या विरोधात लढण्याची प्रतिपिंडे शरीरात आहेत की नाहीत याची माहिती कळते.
- हे सर्वेक्षण सरसकट व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेऊन तपासणीद्वारे केले जाते. लसीकरणामुळे प्रतिपिंडे तयार होतात. तसेच नैसर्गिक संसर्गाला सामोरे गेल्यामुळे प्रतिपिंडे तयार होत असतात.
- हे सर्वेक्षण निरनिराळ्या पद्धतीने केले जाते. झोपडपट्ट्या, घर संकुलात, मोठ्या मोठ्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"