स्वातंत्र्याचा गैरवापर करू नका - विश्वंभर सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 07:12 AM2018-02-03T07:12:10+5:302018-02-03T07:12:32+5:30

संपूर्ण आयुष्यात सैनिकांप्रति समर्पित एवढा भव्य कार्यक्रम आजवर पाहिला नाही. सर्वसामान्यांच्या मनात लष्कर आणि जवानांसाठी असलेली आस्था आणि प्रेम पाहून कृतज्ञतेची भावना आहे. आजच्या तरुणपिढीने निरोगी आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच मैदानी खेळ, वाचन करण्यावर अधिकाधिक भर दिला पाहिजे.

 Do not abuse independence - Lonely World | स्वातंत्र्याचा गैरवापर करू नका - विश्वंभर सिंह

स्वातंत्र्याचा गैरवापर करू नका - विश्वंभर सिंह

googlenewsNext

मुंबई : संपूर्ण आयुष्यात सैनिकांप्रति समर्पित एवढा भव्य कार्यक्रम आजवर पाहिला नाही. सर्वसामान्यांच्या मनात लष्कर आणि जवानांसाठी असलेली आस्था आणि प्रेम पाहून कृतज्ञतेची भावना आहे. आजच्या तरुणपिढीने निरोगी आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच मैदानी खेळ, वाचन करण्यावर अधिकाधिक भर दिला पाहिजे. आजच्या तरुणाईला मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करू नये, असा मोलाचा सल्ला लेफ्टनंट जनरल विश्वंभर सिंह यांनी बुधवारी दिला.
वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडियाच्या सभागृहात अथर्व फाउंडेशनने ‘वन फॉर आॅल, आॅल फॉर वन’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी व नौकानयन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आसामचे राज्यपाल जगदीश मुखी, परमवीरचक्र शौर्यपदक प्राप्त नायब सुभेदार संजयकुमार, महावीरचक्र पदकप्राप्त निवृत्त विंग कमांडर जगमोहन नाथ, परमवीरचक्र पदकप्राप्त निवृत्त कॅप्टन बानासिंग, केंद्रीय पोलीस राखीव दलाचे जवान चेतन कुमार चिता आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘वन फॉर आॅल, आॅल फॉर वन’ संकल्पनेंतर्गत वीर जवान आणि शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास आसाम, हरियाणा, दिल्ली, पंजाब, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश अशा राज्यांतून तिन्ही सेना दलांतील वीर जवान, त्यांचे कुटुंबीय तसेच शहिदांचे कुटुंबीय आणि विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी रोहिणी हट्टंगडी, डॉ. अजिंक्य पाटील, विक्रम गोखले, सोनल चौहान, कपिलदेव, हेमा मालिनी, अमीषा पटेल, नील नितीन मुकेश, आफताब शिवदासानी आणि फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील राणे यांनी आपल्या निवेदनातून ११ शूरवीरांच्या गाथा उपस्थितांसमोर मांडल्या. त्यानंतर या जवानांच्या आयुष्याचा चित्तथरारक प्रवास दाखविणाºया ध्वनिचित्रफिती दाखविण्यात आल्या. यात संतोष महाडिक, सुविंदर सिंग, दौला कांता डोले, नवदीप सिंग, सतीश दाहीया, चुन्नी लाल, हंगपंग दादा, मोहननाथ गोस्वामी, मुकुंद वरदराजन, परमवीरचक्र पदकप्राप्त निवृत्त कॅप्टन बानासिंग आणि केंद्रीय पोलीस राखीव दलाचे जवान चेतन कुमार चिता यांच्या गाथा उपस्थितांसमोर उलगडल्या. जवानांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या अखंड कार्याला सलामी देण्यासाठी सेलिब्रिटींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थितांनी एक मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी, आसामचे राज्यपाल जगदीश मुखी म्हणाले की, शासकीय पातळीवर सैनिकांसाठी केले जाणारे कार्य कौतुकास्पद आहेच, मात्र आता या कार्याचा विस्तार होण्यासाठी स्वयंसेवी आणि सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे. फाउंडेशनच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजातील अशा संस्थांनी सैनिक, त्यांच्या कुटुंबीयांसाठी या कार्यात सहभाग घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या कार्यासाठी आसामचे सरकार कायमच सर्व संस्था, संघटनांना सहकार्य करेल याची ग्वाही देतो.

जवानाचा सन्मान महत्त्वाचा - सुनील राणे
३६५ दिवसांपैकी केवळ दोन दिवस देशभक्ती जागरूक होण्यापेक्षा कायम या जवानांसाठी मनात कृतज्ञ भावना आणि आदर असणे महत्त्वाचे आहे. या जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान अधोरेखित करण्यासाठी या कार्यक्रमातून छोटासा प्रयत्न केला गेला. तरुणपिढी आणि लहानग्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल ही खात्री आहे.

जीना यहाँ.. मरना यहाँ..
मंचावर शूरवीराची गाथा सांगण्यास आलेल्या अभिनेता नील नितीन मुकेश याने आपल्या सुरेल आवाजात जवानांसाठी गाणे गायले. ‘जीना यहाँ, मरना यहाँ... इसके सिवा जाना कहां..’ हे शब्द सभागृहात गुंजले; आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला दाद दिली.

Web Title:  Do not abuse independence - Lonely World

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.