ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा कार्यकर्ता असलेल्या समीर गायकवाडला अटक झाल्यानंतर राज्यभरातून या संस्थेवर बंदीची मागणी होत असतानाच शिवेसेनेने मात्र सनातनची पाठराखण केली आहे. पानसरे, दाभोलकरांचे खरे खुनी शोधायलाच हवे. पण पुरोगामी ढोंगी बाबांना खूश करण्यासाठी कुत्र्याचे माकड करून तपासाचा बोकड करू नका. खर्या गुन्हेगारांना सोडू नका, पण हिंदुत्वाला बदनाम करणार्या सुपार्या वाजवू नका, असे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे. पुरोगाम्यांना खुश करण्यासाठी हिंदूत्वाला टार्गेट करू नका असा इशाराही लेखात देण्यात आला आहे.
गायकवाड हा सनातनचा साधक असून ‘संस्थेच्या अनेक धार्मिक व आध्यात्मिक कार्यात त्याचा सहभाग आहे या कारणास्तव त्याला विनाचौकशी फासावर लटकवा व सनातनवर बंदी घाला अशा मागणीची डबडी वाजू लागली आहेत. हा सर्व प्रकार हास्यास्पद आहे व स्वत:स पुरोगामी वगैरे म्हणवून घेणार्यांचे ढोंग उघडे पाडणारा आहे. सनातनवर बंदीची मागणी करणारे पुरोगाम्यांची तोंड मुस्लिम धर्मांधता आणि हिंदूद्वेषाची गरळ ओकणारे ‘एमआयएम’चे ओवैसी बंधूं, राष्ट्रविरोधी फूत्कार सोडणार्या ‘रझा अकादमी’ यांच्याबाबत बंद का असतात, असा सवालही लेखातून विचारण्यात आला आहे.
काय मह्टले आहे अग्रलेखात :
- ‘सनातन’ या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे व अशी मागणी करणारी थोबाडे तीच, तीच आणि तीच आहेत. कोल्हापूरचे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगलीतून समीर गायकवाड या तरुणास अटक झाली. गायकवाड हा ‘सनातन’चा साधक आहे. ‘सनातन’च्या अनेक धार्मिक व आध्यात्मिक कार्यात त्याचा सहभाग आहे या कारणास्तव गायकवाडला विनाचौकशी फासावर लटकवा व ‘सनातन’वर लगेच बंदी घाला अशा मागणीची डबडी वाजू लागली आहेत. हा सर्व प्रकार हास्यास्पद आहे व स्वत:स पुरोगामी वगैरे म्हणवून घेणार्यांचे ढोंग उघडे पाडणारा आहे. पानसरे यांच्या निर्घृण हत्येचा तीव्र धिक्कार आम्ही केला आहे.
- पानसरे यांच्यासारखे लोक हिंदुत्वावर टीकाटिपणी करत असतात व हे लोखंडी घण सोसूनच हिंदुत्वाची मूर्ती घडली आहे आणि पानसरे यांनी टीका केली म्हणून हिंदुत्वाचे काडीमात्र नुकसान झाले नाही हे आम्ही अभिमानाने सांगत आहोत. म्हणूनच पानसरे यांच्यासारख्या धर्मविरोधकांनी बोलत राहावे या मताचे आम्ही आहोत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सर्वात जास्त विरोधकांना मिळावे. कारण लोकशाहीत विरोधी विचारांना आवश्यक स्थान मिळायला हवे. म्हणूनच पानसरे, दाभोलकर व कर्नाटकातील कलबुर्गीसारख्या मंडळींची हत्या हे निरोगी समाजाचे लक्षण नाही, असे म्हणता येईल.
- गोविंद पानसरे यांनी शिवाजी महाराजांवर काही लिखाण केले व त्यामुळे त्यांची हत्या झाली असावी असा एक कयास आहे. वास्तविक, पंडित नेहरू, मोरारजी देसाई यांनी तर शिवाजी महाराज व महाराष्ट्राच्या बाबतीत भयंकर विधाने केली होती, पण महाराष्ट्राने त्यांचा वैचारिक व आंदोलन मार्गाने धिक्कार केला; हिंसक मार्गाने नव्हे. या पुरोगामी म्हणवून घेणार्या मंडळींचे आम्हाला आश्चर्य वाटते. पानसरे यांनी शिवाजीराजांविषयी वेगळी भूमिका घेतली म्हणून त्यांची हत्या झाली असे पुरोगाम्यांचे म्हणणे आहे. खरे तर अशी बडबड करून ते रोज पानसरे यांचे वैचारिक श्राद्ध घालत आहेत. पुन्हा गंमत अशी की हेच पुरोगामी लोक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मिळणार्या धमक्यांबाबत मात्र तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसले होते. हे ढोंग आहे व आता पानसरे हत्याप्रकरणात ‘सनातन’वर बंदी घालण्यासाठी हेच सर्व ‘निधर्मी’ म्हणवून घेणारे हिंदूंचेच देव पाण्यात घालून बसले आहेत.
- पानसरे हे कम्युनिस्ट विचारांचे होते व ज्या राज्यांमध्ये लालभाईंच्या हाती सत्ता होती व आहे त्या राज्यांत विरोध करणार्यांची मोठ्या प्रमाणावर मुस्कटदाबी करून त्यांची निर्घृण हत्याकांडे घडविली गेली. म्हणजे या कारणास्तव देशातील कम्युनिस्ट पक्षावरही बंदीच घालावी काय? कश्मीरात हिंदुस्थानविरोधी गरळ ओकली जात आहे व हिंदूंना मारणार्या संस्था व राजकीय संघटना आजही तेथे कार्यरत आहेत. त्यांना सत्ताही मिळाली आहे. या संघटना व राजकीय पक्षांवर बंदी घालण्याची मागणी एकही बेगडी पुरोगामी करायला तयार नाही. मुस्लिम धर्मांधता व हिंदूद्वेषाची गरळ ओकणार्या ‘एमआयएम’च्या ओवेसी बंधूंबाबतही या पुरोगाम्यांची थोबाडे बंदच असतात. मुंबईच्या आझाद मैदानावर अमर जवान ज्योतीचा अपमान करून त्या स्मारकाची तोडफोड करणार्या, कायदा-सुव्यवस्था हातात घेऊन राष्ट्रविरोधी फूत्कार सोडणार्या ‘रझा अकादमी’विरुद्धदेखील पुरोगामी मंडळींनी कधीही त्यांचे तोंडाचे डबडे वाजवले नाही. आज ‘सनातन’विरोधात कंठ फुटलेल्या पुरोगाम्यांची तोंडे त्यावेळी का शिवली होती?
- सनातनचा एक ‘साधक’ संशयित म्हणून पकडला, पण पहिल्या दिवसापासून पानसरे हत्या प्रकरणात फक्त ‘सनातन’ किंवा इतर हिंदुत्ववादी लोक आहेत याच दिशेने तपास झाला व तपासकर्त्यांना त्या दिशेने जाता यावे असा माहौल निर्माण केला हे पानसरे व दाभोलकरांच्या खर्या खुन्यांचे यश मानावे लागेल. पानसरे, दाभोलकरांचे खरे खुनी व त्यामागचे सत्य शोधायलाच हवे. पण पुरोगामी ढोंगी बाबांना खूश करण्यासाठी कुत्र्याचे माकड करून तपासाचा बोकड करू नका. खर्या गुन्हेगारांना सोडू नका, पण हिंदुत्वाला बदनाम करणार्या सुपार्या वाजवू नका!