'पुणे, मुंबईमध्ये बहुमजली इमारतींना परवानगी नको'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 04:08 AM2018-07-28T04:08:27+5:302018-07-28T04:08:59+5:30
आमदार अनंत गाडगीळ यांची शासनाकडे मागणी
पुणे : गेल्या काही वर्षांपासून मुंबई पाठोपाठ पुणे शहरातदेखील बहुमजली इमारत बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु सध्या बहुमजली इमारतीसाठी आवश्यक असलेल्या फायर सिस्टीम अद्याप आपल्याकडे विकसित झालेले नसल्याचे मुंबईत नुकत्याच लागलेल्या बहुमजली इमारतीवरून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहराचा विकास आराखडा मंजूर करण्याचा मुद्दा महत्त्वाचा असून, नियोजनबद्ध विकासासाठी बहुमजली इमारतींना परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात केली असल्याची माहिती विधान परिषदेचे आमदार अनंत गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे शहरातील वाढती प्रदूषण पातळीसंदर्भात विधान परिषदेत लक्षवेधी मांडल्यानंतर राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासमवेत बैठक घेण्याचे आश्वासन सभागृहात दिले.
तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) बनावट पदव्या घेऊन डॉक्टर प्रॅक्टिस करीत असल्याच्या १४ तक्रारी आल्याचे सरकारने सांगितले आहे. त्यावरील प्रश्नानंतर ५३ बनावट डॉक्टरांचे परवाने रद्द केल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. पुण्यातील मुजुमदार वाड्याच्या दुरुस्तीसाठी आमदार निधीतून १० लाख रुपये दिले असून, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासमवेत यासंदर्भात बैठक होणार असल्याचे देखील गाडगीळ यांनी या वेळी सांगितले.