वीज बिल वसुलीसाठी येणाऱ्यांवर हल्ले करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:06 AM2021-03-19T04:06:23+5:302021-03-19T04:06:23+5:30
मुंबई : महावितरण कंपनीत एकूण मंजूर पदे ८८ हजार ८६२ आहेत. मात्र त्यातील ५४ हजार ४७७ पदेच भरलेली आहेत. ...
मुंबई : महावितरण कंपनीत एकूण मंजूर पदे ८८ हजार ८६२ आहेत. मात्र त्यातील ५४ हजार ४७७ पदेच भरलेली आहेत. हजारो पदे रिक्त असताना कर्मचारी वेळेचे बंधन न पाळता अविरत काम करीत आहेत. वीज ग्राहकांना चांगली सेवा देत वीज बिल वसुली करीत आहेत. म्हणून वीज ग्राहक यांनी तुमचा सेवक असलेल्या वीज कामगार व अभियंते यांच्यावर हल्ले करू नयेत, असे आवाहन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेकडून करण्यात आले आहे.
आपणास लॉकडाऊन व इतर काळातील वीज बिल माफी हवी असेल तर आपण सरकारकडे मागावी, अशी विनंतीदेखील महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने वीज ग्राहकांना वापरलेल्या विजेचे बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर व नांदेड झोनमध्ये थकबाकीचे प्रमाण प्रचंड आहे. म्हणून जास्त प्रयत्न करून वसुली करण्यात यावी, असे आवाहन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉ. कृष्णा भोयर यांनी दिली.
..........................
मार्च २०१४ मध्ये थकबाकी रु. १४,१५४ कोटी
मार्च २०१५ मध्ये थकबाकी रु. १६,५१५ कोटी
मार्च २०१६ मध्ये थकबाकी रु. २१,०५९ कोटी
मार्च २०१७ मध्ये थकबाकी रु. २६,३३३ कोटी
मार्च २०१८ मध्ये थकबाकी रु. ३२,५९१ कोटी
मार्च २०१९ मध्ये थकबाकी रु. ४१,१३३ कोटी
मार्च २०२० मध्ये थकबाकी रु. ५१,१४६ कोटी
डिसेंबर २०२० मध्ये थकबाकी रु. ७१,५०६ कोटी
..........................