बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेशी प्रतारणा करू नका; रामदास आठवले यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 02:26 AM2019-11-02T02:26:22+5:302019-11-02T02:26:36+5:30

पहिल्या युती सरकारमध्ये शिवसेनेचे आमदार अधिक असल्याने १९९५ साली शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजपचा उपमुख्यमंत्री, असे सत्तावाटप झाले होते.

Do not be deceived by Balasaheb Thackeray's role; Statement by Ramdas Athawale | बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेशी प्रतारणा करू नका; रामदास आठवले यांचे वक्तव्य

बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेशी प्रतारणा करू नका; रामदास आठवले यांचे वक्तव्य

Next

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काँग्रेसविरोधी भूमिकेशी प्रतारणा करणारा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेऊ नये, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या साहाय्याने सत्ता स्थापन करण्याची खेळी शिवसेनेच्या प्रतिमेसाठी घातक ठरू शकते, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेनेत सत्ता स्थापनेबाबत हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले, भाजप-शिवसेनेची नैसर्गिक युती असून या युतीला जनतेने दिलेला स्पष्ट बहुमताचा जनादेश शिवसेनेने डावलू नये. भाजपसोबत वाद मिटवून, तडजोड करून एकत्र सरकार स्थापन करावे. काँग्रेस आघाडीसोबत शिवसेना सरकार जरूर स्थापन करू शकते; मात्र ते सरकार अल्पजीवी ठरेल. त्यामुळे महाराष्ट्राला पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. काँग्रेस आघाडीसोबत जाऊन आत्मघात करू नये, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेतून हटविण्यासाठी शिवशक्ती-भीमशक्ती एकजुटीचा नारा दिला होता. याचे स्मरण उद्धव ठाकरेंनी ठेवावे. शिवसेनेने सत्तेसाठी जर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला तर तो महाराष्ट्राच्या जनतेच्या जनादेशाचा अवमान असेल; त्याचबरोबर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांना हा निर्णय रुचणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला छेद देणारा निर्णय घेऊ नये, असेही ते म्हणाले.

पहिल्या युती सरकारमध्ये शिवसेनेचे आमदार अधिक असल्याने १९९५ साली शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजपचा उपमुख्यमंत्री, असे सत्तावाटप झाले होते. आता हरयाणामध्ये भाजपचे आमदार अधिक असल्याने भाजपचा मुख्यमंत्री आणि जेजेपी पक्षाचा उपमुख्यमंत्री असे सत्तावाटप झाले आहे. महाराष्ट्रातही ‘ज्यांचे अधिक आमदार त्यांचा मुख्यमंत्री’ हे सूत्र अधिक न्यायसंगत ठरते. तरी शिवसेना-भाजप यांच्यात काय ठरले आहे ते एकत्र बसून पुन्हा ठरवून वाद मिटवावा, असे आवाहन रामदास आठवले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केले.

Web Title: Do not be deceived by Balasaheb Thackeray's role; Statement by Ramdas Athawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.