‘येशूविषयीच्या संशोधनाने अस्वस्थ होऊ नये’

By admin | Published: February 29, 2016 02:28 AM2016-02-29T02:28:03+5:302016-02-29T02:28:03+5:30

येशू ख्रिस्त तामिळ ब्राह्मण होता की ख्रिश्चन होता? या वादाने अस्वस्थ होण्याचे काहीच कारण नाही. त्याने समाजासाठी काय केले

Do not be disturbed by 'research about Jesus' | ‘येशूविषयीच्या संशोधनाने अस्वस्थ होऊ नये’

‘येशूविषयीच्या संशोधनाने अस्वस्थ होऊ नये’

Next

मुंबई : येशू ख्रिस्त तामिळ ब्राह्मण होता की ख्रिश्चन होता? या वादाने अस्वस्थ होण्याचे काहीच कारण नाही. त्याने समाजासाठी काय केले, ते पाहणे महत्त्वाचे आहे. मुळात हे पुस्तक १९४६ साली विविध पुराव्यांसह प्रसिद्ध झाले. त्यावर आता चर्चा करण्याचे काहीच कारण नाही. त्या-त्या काळातील संतांना जातीधर्माच्या पलीकडे जाऊन पाहण्याची गरज असल्याचे मत संत साहित्याचे अभ्यासक आणि
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयातील तत्त्वज्ञान संशोधन केंद्र व समुपदेशन केंद्र आणि मराठी संशोधन केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्राचार्या डॉ. शकुंतला सिंह, मराठी संशोधन मंडळाचे संचालक डॉ. प्रदीप कर्णिक, डॉ. सुचित्रा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
‘भगवद्गीता आणि संतसाहित्याचे नाते’ या विषयावर डॉ. मोरे यांना विचारलेल्या प्रश्नांसंदर्भात ते म्हणाले, येशू ख्रिस्ताच्या बाबतीतच नव्हेतर अनेक महापुरुषांच्या बाबतीत विविध दंतकथा प्रचलित असतात. त्यावर संशोधकांनी संशोधन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अनेक गोष्टी सापडतात. ज्यामुळे समाजातील लोकांमध्ये तेढ निर्माण होईल अशा गोष्टींना बाजूलाच ठेवले पाहिजे.
‘भगवद्गीता’ हा राष्ट्रीय ग्रंथ ठरवून या ग्रंथाला संकुचित करू नका, असे आवाहन डॉ. सदानंद मोरे यांनी केले. ‘भगवद्गीता’ हा वैश्विक ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता मराठीत आणून क्रांती केली. भगवद्गीतेचे अध्ययन स्त्रिया आणि शूद्रांना करता येत नव्हते, ज्ञानेश्वरीमुळे ते शक्य झाले. म्हणूनच सर्व वारकऱ्यांनाही गीतेचे आकलन झाले. म्हणूनच सर्व वारकऱ्यांना ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जवळचा वाटू लागल्याचे मोरे या वेळी म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Do not be disturbed by 'research about Jesus'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.